महाराष्ट्र
Trending

आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, राज्यभरातून संताप ! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं !!

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक- विरोधी पक्षनेते अजित पवार

Story Highlights
  • वारकऱ्यांवरील लाठीमाराचा, तो करणाऱ्या सरकारचा निषेध
  • नियोजनाला वारकऱ्यांचं नेहमीच सहकार्य असतं
  • योग्य नियोजनातून ही घटना टाळता आली असती- विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई, दि. 11 :- “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढीवारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्तीपरंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं.

वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु, यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूरवारी सारख्या सोहळ्यात सहभागी होतांना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून, वारीत सहभागी व्हावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

Back to top button
error: Content is protected !!