राजकारण
Trending

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल, तसंही शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्त्व भाजपाला रुचत नव्हतंच: राज ठाकरे

उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली: राज ठाकरे

मुंबई, दि. २ – आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली.

राज्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाजप-शिंदेसेनेसोबत सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय गोटात चर्चेच्या फैरी झडत आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अतिशय बोलकी आणि गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडणारी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे आपल्या प्रतिक्रिये म्हणतात की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.

ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!