महाराष्ट्र
Trending

तू दारुचा धंदा कशाला करतोस, मराठ्यांना हे शोभत नाही ! हप्ता दे नाहीतर दोघा भावांवर केस करून लॉकअपमध्ये टाकण्याच्या धमकीच्या आरोपाखाली मंठा पोलिस स्टेशनच्या ASI वर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – पत्नीची छेडछाड झाल्याच्या प्रकरणाची चार्जशीटसंदर्भात माहिती घेण्यास गेलेल्या तक्रारदाराला उलट धमकावून तू दारुचा धंदा कशाला करतोस. मराठ्यांना हे शोभत नाही. दरमहिन्याला दारुची एक केस व 2,000/- रुपये हप्ता अशी मागील तीन महिन्यांची थकबाकी 6,000/- रुपयाची मागणी केल्याच्या आरोपाखाली मंठा पोलिस स्टेशनच्या ASI वर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हप्ता नाही दिला तर दोघा भावांवर केस करून लॉकअपमध्ये टाकून देईल अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारदाराने फिर्यादीत केला आहे.

यासंदर्भात तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार मंठा पोलिस स्टेशनमध्ये ASI सूर्यकांत माधवराव केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार व त्याचा मोठा भाऊ गरीबी असल्यामुळे कधी कधी चोरून देशी दारू विकतात. मागील दिवाळीत तक्रारदाराच्या पत्नीला छेडछाड झाल्यामुळे पोलीस स्टेशन मंठा (जि.जालना) येथे गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास ASI सूर्यकांत केंद्रे यांच्याकडे होता.

सदर गुन्हयात आरोपीला अटक करून कोर्टात चार्जसीट दाखल केली नाही म्हणून माहिती घेण्यासाठी तक्रारदार दिनांक 28/11/2022 रोजी पोलीस स्टेशन मंठा येथे गेला होता. त्यावेळी ASI सूर्यकांत केंद्रे हे तक्रारदाराला म्हणाले की, तुझ्या पत्नीच्या गुन्हयात चार्जसीट दाखल करतो त्यासाठी तुझ्याकडून पैसे घेत नाही. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून तू आणि तुझा भाऊ दारू विकताय त्याच्याकडे मी कानाडोळा केलाय पण तुम्ही त्याचा मला एक रुपया पण हप्ता दिला नाही.

तुला दारुचा धंदा चालवायचा असेल तर महिन्याला 1 केस व 2,000/- रुपये हप्ता द्यावा लागेल व मागील तीन महिन्यांची बाकी 6,000/- रुपये दिले तरच मी तुला धंदा करू देईन नाहीतर तुम्हा दोघा भावांवर केस करुन लॉकअपमध्ये टाकून देईन आणि तुमची जामीन सुध्दा होऊ देणार नाही. अशी धमकी देऊन चार-पाच दिवसांत मागचे पैसे दिले नाहीस तर तुझ्याकडं बघतो असा दम दिला. त्यानंतर तक्रारदार तिथून निघून गेला.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठून हकीकत सांगितली. त्यानुसार दिनांक 07/12/2022 रोजी लाचलुचपत विभागाचे पथक पंचासह मंठा येथे दि.07/12/2022 रोजी हजर झाले. पंचाला सोबत घेऊन पो.स्टे. मंठा येथे ASI सूर्यकांत केंद्रे यांची भेट घेतली. त्यावेळी ते तक्रारदाराला म्हणाले की, तू फोनवर बोलत नको जाऊ, असे बोलून तुझी गावात कुणी गॅरंटी घेत नाही, गाव तुझ्या विरोधात हाय, तू हे दारुचा धंदा कशाला करतोस, तुम्हाला मराठयांना हे शोभत नाही.

तुझ्याच गावातले तुझ्या विरोधात हाईत गेल्या दोन तीन महिन्यांपासून मी कोनाडोळा केलाय असे म्हणून दारुच्या धंद्या विषयी बोलून मागील तीन महिन्यांपासून चालू हाय बघ तुझं.. असं म्हणून महिन्याला 1 केस व मागील तीन महिन्यांच्या हप्त्याची बाकी म्हणून हाताच्या बोटाने 6 बोटे दाखवले. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना सहा हजार रुपये का असे विचारले असता त्यांनी हां.. असे म्हणून तीन महिने झालेना तुला असे म्हणून आणून दे फटदिशी असे बोलले. तेंव्हा तक्रारदाराने सहा हजार रुपयावरुन पाच हजार रुपये घेण्याची विनंती केली असता त्यांनी अं.. माझ्यापशी नको देऊ, पोलीस पाटालापशी दे.. असे सांगितले.

त्यानंतर दि. 08/12/2022 रोजी सापळा कारवाई लावली. परंतू ही कारवाई होऊ शकली नाही. त्यानंतर पुन्हा दि. 19/12/2022 रोजी ASI सूर्यकांत केंद्रे यांनी तक्रारदाराला पो. ठाणे मंठा येथे बोलविले व दारुच्या हप्त्याच्या पैशाची विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना सध्या पैसे नाहीत बाजारचे दिवशी शुक्रवारी (दि.23/12/2022) रोजी पैसे घेऊन पोलीस स्टेशनला येतो असे तक्रारदाराने सांगितले. त्यानंतर शुक्रवारी दिनांक 23/12/2022 रोजी सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले.

ठरल्याप्रमाणे सापळा पथक मंठा येथे हजर झाले. तक्रारदार पोलिस स्टेशनमध्ये जाताच तू काही बोलू नको. जा तू..मी येतो तिथं.. तू जा इथून असे बोलून सापळा कारवाईवर त्यांना संशय घेऊन पैसे न घेता तक्रारदाराला पोलीस स्टेशनमधून काढून दिल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून मंठा पोलिस स्टेशनमध्ये ASI सूर्यकांत माधवराव केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

Back to top button
error: Content is protected !!