छत्रपती संभाजीनगर
Trending

कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तपासणी व वाटपासाठी विशेष कक्ष स्थापन ! छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपर्यंत 50 कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह,दि. 6 – मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात विषेश कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाला असून जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत 50 दाखले वाटप झाले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी दिली.

हे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य पुराव्याची तपासणी करण्यासाठी न्या.शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने पुराव्याची वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे आणि पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी समितीच्या निर्देशाने विशेष कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या कक्षामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत 50 कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे, असे विधाते यांनी सांगितले.

जिल्हा कक्ष कार्यकारणी समितीत ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),पी.एच.चौगुले, पोलीस उप अधिक्षक (गृह), श्री.वीर, जिल्हाअधिक्षक, भूमि अभिलेख, जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), संतोष झगडे, अधिक्षक, राज्य अबकारीकर, किशोर कुलकर्णी , जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव, राजमोडे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अशोक कायंदे, नगर पालिका प्रशासन अधिकारी, जि.अ.कार्यालय, जयवंत नाईक, अधिक्षक कारागृह, सय्यदा फीरासत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सय्यद शाकीर अली, अधिक्षक, वक्फ बोर्ड, डॉ. भगवान साखळे, कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अशोक गोटे, सहायक संचालक, राज्य पुरातत्व विभाग,भाऊसाहेब जगताप, विभागीय सहायक संचालक, भाषा संचालनालय इत्यादी विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कक्षाची कार्यपद्धती- या जिल्हास्तरीय अधिकारी यांनी विशेष कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, येथे उपस्थित राहुन विविध विभागांशी समन्वय साधणे, अभिलेखे उपलब्ध करून घेऊन त्यांची छाननी करणे, कुणबी जातीच्या नोंदी असलेले अभिलेखे वेगळे करुन त्याबाबत विहित नमुन्यातील अहवाल कार्यालयास व समितीस सादर करणे इ.कामे विहित कालमर्यादेत करण्यात येत आहेत.

या शिवाय मा.न्यायालयातील जुन्या अभिलेख्यांमध्ये देखील कुणबी-मराठा / मराठा-कुणबी /कुणबी असे जातीवाचक उल्लेख असलेले (सन 1967 पूर्वीचे) अभिलेखे उपलब्ध करून देणे बाबत संबंधित न्यायालयाकडे विनंती करून अभिलेखे उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 50 कुणबी – मराठा, मराठा – कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!