मनोज जरांगे यांचा सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटंम, एक दिवस संपला, आता वेळ मिळणार नाही ! सरकारने माझ्याकडून पुरावे घ्यावे व मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा अध्यादेश काढावा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ -: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून जोरदार पाठिंबा मिळत असून जरांगे पाटील यांनी काल सरकारच्या शिष्टमंडळाला दिलेल्या ४ दिवसांचा अल्टिमेटमपैकी आज एक दिवस उलटला असून संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल एवढे पुरावे माझ्याकडे असून सरकारला हे पुरावे द्यायला मी तयार आहे. मात्र, आता सरकारने वेळ मागू नये असा इशारा मराठा आरक्षणासाठी आर पारची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषणस्थळीच सलाईन चढवले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकार काढत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही या भूमीकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने सरकारला चांगलाच घाम फुटला असून मंत्रालयात सरकार व प्रशसनाच्या हालचाली वाढल्या आहेत.
दरम्यान, आज उपोषणाचा नववा दिवस असून आज, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमीका जाहीर केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संपूर्ण मराठा समाजारा सरसकट आरक्षण देण्याऐवढे पुरावे माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे मी सरकारला देण्यास तयार आहे. मी कालच सरकारला चार दिवसांचा वेळ दिला आहे. सरकारने पुरावे नाही, दस्ताऐवज जमा करण्यासाठी वेळ मागू नये. यासाठीचा त्यांचा वेळ वाचावा म्हणून हे सर्व पुरावे मी त्यांना द्यायला तयार आहे. सरकार ज्या ठिकाणाहून हे पुरावे जमा करणार आहे तेथूनच हे सर्व पुरावे मी जमा केले आहे. यासाठी सरकारने हे पुरावे माझ्याकडून घेऊन जावे व मी दिलेल्या वेळेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अशी मागणी करतानाच सरकारने आता वेळ मागू नये, असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
सरकारला चार दिवसांचा वेळ मी दिला आहे. यापैकी आज एक दिवस संपत आहे. मराठा समाजाला सरकट आरक्षण देण्याएवढे पुरावे आम्ही जमा केले आहे. हे सर्व पुरावे माझ्याकडे असून सरकारला ते द्यायला मी तयार आहे. राज्यपालाच्या परवानगी घेवून वटहूकुम काढावा. सरकारने आता कारणे सांगू नये. एका दिवसांत अध्यादेश काढण्याऐवढे पुरावे मी सरकारला देतो. या पुराव्यांच्या आधारे सरकार आता एका दिवसात अध्यादेश काढू शकतं. यामुळे सरकारने यावे आणि पुरावे घेवून जावे. मात्र, सरकारने आता वेळ मागू नये, असेही जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावले.
नऊ दिवसांपासून जरांगे पाटील यांनी अन्नत्याग केला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने काल, ४ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती त्यावेळी जरांगे पाटील यांनी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. जर चार दिवसांत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर पाणीसुद्धा पिणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता याचा पुनरुच्चारही जरांगे पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe