राजकारण
Trending

जालन्यातील मराठा आरक्षण उपोषणातील अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार: शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई, दि. २- महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. ही अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

घटनेची पार्श्वभूमी अशी- मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण सुरु आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत असल्याचे कारण पुढे करून पोलिस त्यांच्याशी चर्चेला गेले. दरम्यान, पोलिस आणि उपोषणकर्ते यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसन रेटारेटीत झाले. त्यानंतर पोलिसांनी मंडपात घुसून लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोनल पेटल्याची बातमी वार्यासारखी राज्यभरात पसरली अन् त्याचे पडसाद दिसू लागले. राज्यभरात विविध ठिकाणी सुमारे ११ बस जाळल्या.

दरम्यान, या घटनेत आंदोलकांसह पोलिसही जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिलांनाही सोडले नाही. डोक्यातून रक्त निघेपर्यंत लाठीचार्ज केला. रबराच्या गोळ्या झाडले. आश्रुधराच्या नळकांड्याही फोडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या महामार्गावर २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला होता. मात्र, राज्य सरकारने या मोर्चाचीही ठोस देखल घेतली नाही. दरम्यान, या मोर्चाच्या दुसर्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते.

त्यानंतर शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १० जण उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधव उपोषणस्थळी हजर होते. दरम्यान, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे कारण पुढे करून पोलिस आंदोलनस्थळी दाखल झाले. उपोषणकर्त्याने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, अशी विनंती केल्याचा दावा पोलिस करत आहे. मात्र, विनंती करण्यासाठी पोलिसांचा एवढा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी कोणाच्या इशार्यावरून लावला होता ? असा सवाल उपस्थित करून लाठीमारचा हा सर्व प्रि प्लॅन होता, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Back to top button
error: Content is protected !!