कन्नडराजकारणवैजापूर
Trending

मराठा आंदोलनामुळे राजकीय नेत्यांची कोंडी, सासुरवाडीला जाणेही अवघड ! वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांची गाडी सासुरवाडी कन्नडला अडवली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी दौरे रद्द केले आहेत. गोवोगावच्या दौर्यातून काहीसे निवांत असलेल्या शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आज सासुरवाडी कन्नडकडे आपली गाडी वळवली. मात्र, तेथेही मराठा युवकांनी आमदार रमेश बोरनारे यांची गाडी अडवली. कन्नडच्या पिशोर नाका परिसरात मराठा युवकांनी आमदार रमेश बोरनारे यांची गाडी अडवून मराठा आरक्षण तातडीने द्यावे, अशी मागणी केली. गावागावांत राजकीय नेत्यांना बंदी घातल्यामुळे सासुरवाडीकडे जातानाही आमदार बोरनारे यांचा मराठा युवकांनी पिच्छा सोडला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत भव्य दसरा मेळावा घेतला. या मेळाव्याला वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे आपल्या समर्थकांसह दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी मुंबईत गेले होते. हा दसरा मेळावा आटोपून आमदार रमेश बोरनारे हे रात्री २ वाजेच्या सुमारास मतदारसंघात परतले. अतिशय व्यस्त शेड्यूल असणारे आमदार रमेश बोरनारे यांनी आज चक्क सासुरवाडीत जाण्याचे ठरवले. त्याचे कारणही तसेच असावे. सध्या राजकीय नेत्यांना मराठा समाजाने गोवोगावी बंदी घातली आहे. गावो गावच्या दौर्यांचं प्रमाण अतिशय कमी झाल्याने व यातून वेळ मिळाल्याने तो वेळ नातेवाईकांच्या भेटी गाठी घेण्याचे ठरवून आमदार रमेश बोरनारे यांनी आज सासुवाडीला भेट देण्याचे ठरवले.

आमदार रमेश बोरनारे यांची सासुरवाडी कन्नडची आहे. कन्नडच्या पिशोर नाका परिसरातील गर्जे कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या आमदार रमेश बोरनारे यांची गाडी पिशोर नाक्यावर मराठा आंदोलकांनी अडवली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देवून मराठा आंदोलकांनी आमदार रमेश बोरनारे यांची गाडी थांबवली.

३० दिवसांचा अवधी घेवूनही ४० दिवसांत का आरक्षण दिलं नाही ? मराठा आंदोलकांचा आमदार बोरनारेंना सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटलांना मराठा आरक्षण देण्यासाठी ३० दिवसांचा अवधी मागितला होता. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४० दिवस दिले होते. तरीसुद्धा ४० दिवसांत का आरक्षण दिलं नाही ? असा सवाल मराठा आंदोलकांनी आमदार रमेश बोरनारे यांना केला.

उपोषणाला पाठींबा, मुख्यमंत्र्यांची भेट घेवून तुमच्या भावना कळवणार- आमदार रमेश बोरनारे
सरकारला आमच्या भावना कळवा आम्हाला आरक्षण तातडीने द्या अशी मागणी मराठा युवकांनी केली. यावर आमदार रमेश बोरनारे म्हणाले की, मी पण मराठा असून मला समाजाच्या भावना कळतात. मी तुमच्या सोबत असून माझा तुमच्या उपोषणाला पाठींबा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असून मी त्यांची भेट घेऊन तुमच्या भावना त्यांना कळवतो असे आमदार बोरनारे यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!