महानगरपालिका
Trending

मनपाच्या सात शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव ! एकूण २५ प्रस्तावातून निवडले आदर्श शिक्षक !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून आज मनपाच्या सात शिक्षकांना आदर्श शिक्षक व शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महानगरपालिकेच्या वतीने मनपा शाळेतील दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे या पुरस्काराचे वितरण झाले नाही. या वर्षी प्रशासक यांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले होते. एकूण २५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावातून सात शिक्षकांची आदर्श शिक्षक व शिक्षक सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

आज दि ०१ मे महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मनपा मुख्यालय येथे जिल्हाधिकारी तथा मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सात शिक्षकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, रविंद्र निकम, मुख्य लेखापरीक्षक डी के हिवाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, उप आयुक्त नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, शिक्षण अधिकारी सुनील डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे,सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांची उपस्थिती होती.

आदर्श शिक्षक व शिक्षक सन्मान पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये तुषार ताठे, फिरोज खान काशिनाथ मरकड,शेख जुबेर ताज मोहंमद, शाहीन फातेमा यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तर वैशाली देशमुख,उमेरा पटेल व नाजेमा सिद्दीकी यांना शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाचे नाना भिसे, राजेश गावित व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी केले.

Back to top button
error: Content is protected !!