प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निवडणूक झालेली नाही ! महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदार आमच्या बाजुने !!
नागालँडमधील आमदारांना एनडीएसोबत सहभागी होण्याची लेखी परवानगी दिली त्याचवेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो हे सिध्द होते - प्रफुल पटेल
मुंबई दि. २६ सप्टेंबर – ३० जूनलाच आम्हाला नागालँडमधील आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमधील आमदारांना अधिकृतरित्या एनडीएला पाठिंबा देण्याची लेखी परवानगी दिलेली आहे. आज आम्ही एनडीएचे घटक झालो असलो तरी नागालँडमधील आमदारांना परवानगी दिली गेली त्याचवेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो हे सिद्ध होते असा थेट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला.
३० जूनला आमचा निर्णय होऊन अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि या निर्णयाला आम्ही व नागालँडच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले.
आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता मात्र १ एप्रिल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने चार राज्यांत आवश्यक मतदान न झाल्याने राष्ट्रीय मान्यता रद्द केली. आता आम्ही नागालँड आणि महाराष्ट्रामध्ये मर्यादित आहोत मात्र आम्ही इतर राज्यातही निवडणूक लढवू शकतो. जोपर्यंत मतदान वाढत नाही तोपर्यंत आम्ही नागालँड व महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित राहणार आहोत असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निवडणूक झालेली नाही ! महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदार आमच्या बाजुने !!
महाराष्ट्रातील ५३ मधील ४३ आमदार आमच्या बाजुने आहेत. तर विधानपरिषदेचे ९ पैकी ६ आमदारही आमच्या बाजूने आहेत. नागालँडमधील ७ आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. पक्ष संघटनेचा विचार केला तर आमच्या पक्षाची जी घटना आहे त्यानुसार त्या – त्या वेळी निवडणूक व्हायला हवी होती ज्यापध्दतीने व्हायला हवी होती ती निवडणूक आमच्या पक्षात झालेली नाही. फक्त एक अधिवेशन बोलावून आम्ही पदाधिकारी बनलो तर मात्र हे पक्षाच्या घटनेत कायद्याने योग्य व अधिकृत नाही असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले.
संघटनेत जितके पण प्रदेशाध्यक्ष आहेत ते फक्त नॉमिनेटेड अध्यक्ष राहिले आहेत आणि विशेष म्हणजे माझ्या सहीने यांची निवड झालेली आहे. मला हेच सांगायचे आहे की, पक्षसंघटनात्मक नियुक्त्या होतात. पक्ष हा महत्वपूर्ण असतो. मात्र पक्षातील निवडणूका घटनेच्या अनुरुप झाल्या असतील तर ते योग्य आहे. आमच्या पक्षात निवडणूका झालेल्या नाहीत. त्याचे रेकॉर्ड नाही. त्यामुळे अधिवेशनानंतर निवडलेले पदाधिकारी कसे चालतील. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी घटनात्मक नाहीत. निवडणूक आयोगाकडे पक्षाबद्दल मांडणी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडे याबाबत मांडणी करण्यात आली आहे. आमच्याच पक्षात २००३ मध्ये पी ए संगमा विरुद्ध शरद पवार अशी याचिका दाखल होती ती प्रक्रिया मीच निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती व मीच ती हाताळत होतो असेही प्रफुल पटेल म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या केससंदर्भाशी आमचा संबंध नाही. आमच्या पक्षाची प्रक्रिया वेगळी आहे. ज्या माध्यमातून आमच्या पक्षात काम सुरू आहे त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोरील केस असेल किंवा सुप्रीम कोर्टात सुरू असलेली केस असेल मात्र आमची केस वेगळी आहे. सर्व कायद्याचा अभ्यास करूनच आम्ही हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आमच्या मनात किंतू परंतु असणार नाही. निवडणूक आयोग जो निर्णय देईल त्यावर बोलायचे नाही मात्र ज्या आधारावर कायद्याची प्रक्रिया लक्षात घेऊन पाऊले टाकण्यात आली आहेत त्यावरून आमच्या मनात किंतू परंतु नाही असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी नागालँडमधील आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे शाब्दिक स्वागत केले. या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वन्तुंगो ओडयो, आमदार पिक्टो शोहे, आमदार पुथाई लोंगों, आमदार नमरी नचांग, आमदार वाय. मेहोनबिमो हुमतोसी, आमदार तोहीओ येप्तोमी (प्रवक्ता), आमदार पोंगशी फोम, आमदार मनकाहो कोनयाक, महिला उपाध्यक्ष लियींगबेनी हुमतोसे, युवक सरचिटणीस तासोनी इसाक आदी उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe