राजकारण
Trending

छोटसं बोललं तर डोळ्यात टचकन पाणी येतं, माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही ! सुप्रिया सुळेंचा भाजपा व अजितदादा समर्थकांवर थेट हल्लाबोल !!

आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद देण्याची वक्तव्यं करणाऱ्यांपेक्षा आमच्यासारख्या मुली परवडल्या, अजितदादांवर पलटवार

मुंबई, दि. ५ – “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी,
लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी”
हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला. मी महिला आहे, छोटसं बोललं तर डोळ्यात टचकन पाणी येतं, पण संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच महिला अहिल्या, तीच ताराराणी आणि तिच जिजाऊ होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे. ही लढाई एका व्यक्तीविरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढायची आहे, असे आवाहन सुप्रियाताईंनी कार्यकर्त्यांना केले.

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला काही लोक नॅचरली करप्ट पार्टी असे बोलत होते. पण ना खाऊंगा ना खाने दुंगा, मुझे जरूरत पडेगी तो नॅचरली करप्ट पार्टी पुरा खा जाऊंगा असा घणाघाती टोला त्यांनी देशाच्या राज्यकर्त्यांना लगावला. या देशात सगळ्यात करप्ट पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पक्ष आहे, असा जाहीर आरोप त्यांनी केला.

नामोल्लेख टाळून अजितदादांवर पलटवार- काही लोक म्हणतात की ज्यांचे वय झाले त्यांनी केवळ आशीर्वाद द्यावेत. पण वय हा केवळ आकडा आहे, लढण्याची जिद्द हवी, असे प्रत्युत्तर सुप्रियाताईंनी दिले. आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद देण्याची वक्तव्यं करणाऱ्यांपेक्षा आमच्यासारख्या मुली परवडल्या असा टोलाही त्यांनी लगावला. या परिस्थितीत आपण हताश व्हायचे नाही. आपण पक्ष पुन्हा बांधू शकतो हा विश्वास आहे. जे गेलेत त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोण यावर कार्यकर्त्यांमधून शरद पवार असा एकच आवाज उठला. त्यावर सुप्रियाताई म्हणाल्या की, त्यांच्याही बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो आहे. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणा विरोधात लढायचं आहे. भाजपने केवळ द्वेष पसरवला आहे. त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला उतरायचे आहे.

सत्ता येते आणि जाते, मात्र केवळ सत्तेतून सुख मिळत नाही. आपल्याकडे ज्या खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत त्यावर नवीन लोकांना बसण्याची संधी मिळेल. आपण नवीन उमेदीने कामाला लागूया, ज्यातून महाराष्ट्राची जनता याच योद्ध्यामागे उभी राहील. जे अनेकदा महाराष्ट्राने दाखवले आहे ते पुन्हा एकदा आपल्याला करायचे आहे. ज्यातून ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि चिन्हं आपल्याकडे राहील. आपल्या पक्षाचा एकच शिक्का आहे ज्याचे नाव हे शरद पवार आहे, अशा शब्दात सुप्रियाताईंनी सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

Back to top button
error: Content is protected !!