संपाने आरोग्य यंत्रणा सलाईनवर ! कंत्राटी मनुष्यबळांची नियुक्ती करण्याचे राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सकांना निर्देश !
आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी उपाय योजावेत- आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार
मुंबई, दि. १७ : राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी दि. १४ मार्च २०२३ पासून संप पुकारलेला असून, या संपामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत काही कर्मचारीही सहभागी झालेले आहेत. मात्र, आरोग्य सेवा अत्यावश्यक व संवेदनशील सेवा असल्यामुळे राज्यातील रुग्ण सेवेत कुठेही बाधा येऊ नये व विना अडथळा सार्वजनिक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करावे, अशा सूचना राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.
संपाच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असणारी आरोग्य सेवा सुरु रहावी यासाठी व क्षेत्रीय यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा. तसेच विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, लेबर रूम या संवेदनशील विभागांची सेवा अविरत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. पर्यायी मनुष्यबळाबाबत आवश्यक उपाययोजना आखून कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रुग्ण सेवा बाधित होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशाही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत.
रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आपत्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात याव्यात, जेणेकरुन कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा अंखंडित सुरु राहील, क्षेत्रीय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी नियुक्त करावे, आवश्यकतेनुसार दैनंदिन तत्वावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सकस्तरावर आवश्यतेनुसार दैनंदिन तत्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्यात यावेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
दैनंदिन तत्वावरील कर्मचा-यांची नेमणूक सरकारी कर्मचा-यांचा संप मिटेपर्यंत अथवा दि. ३१.०३.२०२३ पर्यंत जे अगोदर होईल तोपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर दैनंदिन तत्वावर नेमेलेले मनुष्यबळ कार्यरत ठेवायचे असल्यास त्याबाबत स्वतंत्र सूचना आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणार आहेत.
सरकारी व खासगी नर्सिंग महाविद्यायालये, वैद्यकीय महाविद्यालये, औषधनिर्माता महाविद्यालये यांच्याशी समन्वय साधून त्यांच्यामार्फत आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही करावी आणि संपकाळात या महाविद्यालयांमार्फत उपलब्ध प्रशिक्षणार्थीच्या नेमणुका रुग्णालयांमध्ये कराव्यात असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वयकाची नेमणूक करण्यात करण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कार्यरत आरोग्य मित्र यांच्या नेमणुकादेखील करता येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
संपामध्ये सहभागी कर्मचारी, आरोग्य संस्थांमध्ये उपस्थित कर्मचारी, बाधित रुग्ण याबाबतची दैनंदिन माहिती मुख्यमंत्री कार्यालय तसेच आरोग्य मंत्री कार्यालयास उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून यासाठी राज्यस्तर, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे तसेच जिल्हा शल्य चिकित्सकस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe