छत्रपती संभाजीनगरराजकारण
Trending

आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंची पोलिस ठाण्यात तक्रार ! उपनेत्या सुषमा अंधारेंच्या विरोधात अर्वाच्य भाषेत टीका केल्याचा आरोप !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, आमदार संजय शिरसाट यांनी आरोप अमान्य केले आहेत.

यासंदर्भात दानवे यांनी क्रांती चौक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दांचा वापर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांनी केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध भा दं वि च्या कलम ३५४ (अ) (१) (iv), ५०९, ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.

दानवे यांनी नमूद केले आहे की, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विधान परिषद सदस्य असून विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे. दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी महाविकास आघाडीची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेबाबत पूर्वतयारी चालू आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २६ मार्च, २०२३ रोजी असताना मी टीव्हीवर छत्रपती संभाजीनगर येथील विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अत्यंत अर्वाच्य भाषेत टीका केल्याचे पाहिले आणि ऐकले. शिरसाट यांनी उद्गारलेले शब्द निश्चितपणे स्त्री मनास लज्जा उत्पन्न करून त्यांचा अपमान करणारे आहेत.

संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत “…परंतु जेव्हा तुम्ही आम्हाला बोलताना आपल्या माणसाला जेव्हा बोलता त्या टाईमाला आपल्या बोकांडी कोण बसलय याचा विचार करा नं” तसेच ” संजय भाऊ माझेच भाऊ आहेत, सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ माझेच भाऊ आहेत. काय काय लफडे केलेत माहित नाहीत ” असे शब्द उच्चारले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दानवे यांनी दिली आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त यांना दिली आहे.

Back to top button
error: Content is protected !!