छत्रपती संभाजीनगर
Trending

मुकुंदवाडीला एक्सप्रेस रेल्वेचा थांबा देण्यासाठी तपशीलवार सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी !

खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांना यश; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिले आदेश

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ : मुंकुंदवाडी येथे एक्सप्रेस रेल्वे थांबत नसल्याने प्रवाश्यांची व व्यापार्‍यांची प्रचंड गैरसोय होवून आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याने खासदार इम्तियाज यांनी मुकुंदवाडीला तपोवन एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वेला थांबविण्यात यावे याकरिता थेट रेल्वे केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णवजी यांना पत्राव्दारे मागणी केली होती. त्याअनुषंगाने मुकुंदवाडी येथे रेल्वे थांबा देण्यात यावा याकरिता संबंधितांना तपशीलवार सर्वेक्षण करून रेल्वे थांबा देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे केंद्रीय मंत्री यांनी खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळविले.

मुकुंदवाडी येथे एक्सप्रेस रेल्वेचा थांबा देण्यात यावा याकरिता इम्तियाज जलील यांनी केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णवजी यांच्यासह अध्यक्ष रेल्वे बोर्ड, मुख्य व्यवस्थापक व प्रादेशिक व्यवस्थापक दक्षिण मध्य रेल्वे विभागाला सुध्दा पत्राव्दारे मागणी केली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले की, छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा आणि शेंद्रा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक हब उभारण्यात आले आहे. औद्योगिक केंद्र आणि शहराचा विस्तार दोन्ही मुकुंदवाडीकडे अधिक आहे. मराठवाड्याच्या सर्व भागातून मोठ्या प्रमाणात व्यापारी व दैनंदिन प्रवासी लांबून या भागात येतात. लांब पल्ल्याच्या प्रवासीही मुंबईला जातात. छत्रपती संभाजीनगरमधील सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कमकुवत आहे.

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक शहराच्या दुसर्‍या टोकाला असून तेथून ये-जा करणे अवघड आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर तपोवन एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या तीन गाड्यांना थांबा देणे आवश्यक आहे. यामुळे या भागातील व्यवसाय आणि उद्योगांचा विकास होण्यास मदत होईल. विशेषतः, मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा देण्याबाबतचा औचित्य / व्यवहार्यता अहवाल सकारात्मक असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले होते.

Back to top button
error: Content is protected !!