छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

पैठण तालुक्यातील विहामांडवात चोरी करणारी अमरावती व बीडची टोळी जेरबंद ! जालना, पुसद, कारंजा, नांदगांव खंडेश्वरमध्ये तीन दिवस पाठलाग करून ठोकल्या बेड्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २८- पैठण तालुक्यातील व पाचोड पोलिस स्टेशन हद्दीतील वाहामांडवात झालेल्या चोरीचा तपास करत असताना पोलिसांना घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गळाला लागली. या टोळीच्या मागावर असताना पोलिसांना तब्बल तीन दिवस त्यांचा  जालना, पुसद, कारंजा, अमरावती, नांदगांव खंडेश्वर येथे पाठलाग करावा लागला. सुरुवातीला दोघे गळाला लागले. त्यानंतर त्यांचे साथीदार गळाला लागले. हे चोरटे ज्या भंगारवाल्याला माल विकायचे तिथपर्यंत पोलिसांनी पाठपुरावा करून ही टोळी जेरबंद केली. या टोळीकडून अनेक गुन्ह्याची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

१) मोहसीन खान नदीर खान वय २६ वर्षे, रा. महेबुबनगर, ता. जि. अमरावती, २) चेतन सुकलाल ठाकरे वय २५ वर्षे, रा. मंगरूळदस्तगिर, ता. धामणगांव रेल्वे जि. अमरावती ३) सोहेल बासेद जुला वय २८ वर्षे, रा. डिग्रस जि. यवतमाळ मुळ रा. मोमीनपुरा बीड ४) अस्लमखा गुलाबखा पठाण वय ४२, रा. मधुकरनगर, पुसद, जि. यवतमाळ भंगार व्यापारी ५) शेख शकील शेख हफीज वय ३२ वर्ष, रा. नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती अशी आरोपींची नावे आहेत.

पाचोड येथे फिर्यादी प्रमोद भगवानराव पन्हाळकर (रा. विहामांडवा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पाचोड पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली की, दि.१८/०८/२०२३ रोजीचे रात्री आठ वाजेपासून ते दि. १९/०८/२०२३ रोजीचे सकाळी ०५.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी विहामांडवा गावातील त्यांचे मालकीचे किसान मशनरी दुकानाचे शटर तोडून दुकानातील समर्शिबल मोटार कॉपर वायर मोनो ब्लॉक मोटार कॉपर वायर मोटार बुश असा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या तक्रारीवरून पाचोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्हयाचा एसपी मनिष कलवानिया यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना सतीश वाघ, पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्हा टोळीतील आरोपी १) मोहसीन खान नदीर खान वय २६ वर्षे, रा. महेबुबनगर, ता. जि. अमरावती, २) चेतन सुकलाल ठाकरे वय २५ वर्षे, रा. मंगरूळदस्तगिर, ता. धामणगांव रेल्वे जि. अमरावती यांनी त्यांच्या इतर साथीदारासोबत मिळून केला आहे.

या माहितीवरून त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करून रवाना केले. पथकातील पोउपनि मधुकर मोरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक माहितीच्या ठिकाणी ज्यात जालना, पुसद, कारंजा, अमरावती, नांदगांव खंडेश्वर येथे सतत तीन दिवस आहोरात्र त्यांचा पाठलाग करून आरोपीतांचा शोध घेतला. आरोपी मोहसीन खान नदीर खान व चेतन सुकलाल ठाकरे हे मिळून आले. त्यांना त्यांच्या गुन्हयांविषयी व इतर साथीसदारांबाबत विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार ३) सोहेल बासेद जुला वय २८ वर्षे, रा. डिग्रस जि. यवतमाळ मुळ रा. मोमीनपुरा बीड यांच्या व इतर साथीदारा सोबत करून गुन्हयातील चोरलेला मुद्देमाल हा आरोपी ४) अस्लमखा गुलाबखा पठाण वय ४२, रा. मधुकरनगर, पुसद, जि. यवतमाळ भंगार व्यापारी यास विक्री केला असल्याचे सांगितले.

सदर आरोपीचा पत्यावर शोध घेतला असता ते मिळून आले. त्यांना गुन्हयातील मुद्देमाला बाबत विचारपूस करता त्यांनेही गुन्हयातील मुददेमाल हा जास्त रक्कमेला आरोपी ५) शेख शकील शेख हफीज वय ३२ वर्ष, रा. नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती यास विक्री केला असल्याचे सांगितले त्याचाही त्याच्या राहते पत्यावर शोध घेता तो मिळून आला.

या आरोपीतांना गुन्हयांसंबंधी विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिल्याने आरोपी मोहसीन खान नदीर खान यांने व आरोपी सोहेल बासेद जुला यांनी व इतर आरोपीतांना गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने त्यांच्या ताब्यातून विना क्रमांकाची इंडिका विस्टा कार व आरोपी सोहेल बासेद जुला याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेली टोयोटा इनोव्हा कार मिळून आली.

तसेच दोन्ही वाहनांमध्ये गुन्हे करण्यासाठी वापरलेले साहित्य एक लोखंडी सब्बल, एक लोखंडी कैची, एक लोखंडी पक्कड, शटर कट करण्यासाठी वापरण्यात येणारे कटर असे घरफोडी करण्याचे साहित्य तसेच मोबाईल हॅन्डसेट नगदी रुपये ५०००/- असे एकूण ५,४५,७००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपीतांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पाचोड पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. आरोपी हे सराईत असल्याने त्यांनी जिल्हयातील व इतर जिल्ह्यांत बरेच घरफोडीचे अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता आहे. गुन्हयातील आरोपीतांच्या इतर साथीदारांबाबत अधिक तपास सुरू आहे.

ही कामगीरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सपोनि सुधीर मोटे, पो.उप.नि. मधुकर मोरे, पोह लहु थोटे, पोह कासीम शेख, पोह रवि लोखंडे, पोह विठठल डोके, पोअं योगेश तरमाळे, आनंद घाटेश्वर, पोअं राहुल गायकवाड, चापोशि संजय तांदळे यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!