महाराष्ट्र
Trending

भूविकास बँकेतील ३१८ खातेधारकांच्या चेहऱ्यावर आनंद ! परभणी तालुक्यातील ३९४ सातबारा कर्जबोजेमुक्त !!

तहसीलदार गणेश चव्हाण यांचा पुढाकार

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३-  भूविकास बँकेच्या खातेधारकांच्या कर्जबोजाची नोंद तातडीने कमी करून देण्यासाठी तहसीलदार गणेश चव्हाण यांनी तहसील कार्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन करून परभणी तालुक्यातील ८४ गावातील ३१८ शेतक-यांच्या ३९४ सातबारांवरील कर्जबोजा कमी केला आहे. सातबारा कर्जबोजेमुक्त झाल्यामुळे शेतक-यांनी प्रशासनाप्रती समाधानाचे भाव व्यक्त केले आहेत.

शेतक-यांचे जीवनमान उंचावले जावे, त्यांची आर्थिक भरभराट व्हावी, यासाठी शेतीच्या विकासाकरिता भूविकास बॅंक दीर्घकालीन कर्ज अदा करीत होती. या कर्जबोजाच्या नोंदी संबंधित शेतकऱ्याच्या सातबारावर घेण्यात आल्या होत्या. शेतजमिनीच्या उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या बोजामुळे कर्ज काढणे, गहाण ठेवणे, हस्तांतरण करणे, खातेफोड करणे वा शेतविक्री कामात अडचणी येत होत्या.
मात्र राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ९ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील भूविकास बँकांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून राज्यातील या बँकांच्या कर्जदारांकडील संपूर्ण कर्ज रक्कम माफ करण्यात आली आहे.

जिल्हा भूविकास बँकेतील खातेधारकांच्या सातबारावरील कर्जबोजा कमी करण्याचे आदेश तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावरून देण्याबाबत जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँक मर्यादित परभणीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी विनंती केली होती. शेतक-यांच्या सातबारावरील या नोंदी कमी करण्यासाठी तहसीलदार गणेश चव्हाण यांनी पुढाकार घेत तहसील कार्यालयात फेरफार अदालतीचे नुकतेच आयोजन केले होते.

या अदालतीमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या साहाय्याने परभणी तालुक्यातील ८४ गावातील ३१८ शेतकरी खातेदार यांच्या ३९४ सातबारा उताऱ्यावरील कर्ज बोजाच्या नोंदी कमी केल्या. सदर कर्ज बोजे कमी झाल्याबाबतचे फेरफार व सातबारा उतारे भूविकास बँकेस देण्यात आले आहेत.

परभणी जिल्हा भूविकास बँकेकडील सर्व कर्जदारांची संपूर्ण कर्ज रक्कम माफ केल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज आणि इतर जमिनीविषयक शासकीय कामे करण्यासाठी असलेला महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. तहसीलदार श्री. चव्हाण यांच्या पुढाकारामुळे ३९४ शेतक-यांच्या चेह-यावंर आनंद पसरला असून, खातेधारक शेतक-यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!