महाराष्ट्र
Trending

बीडला गावी गेलेल्या एसडीमचे घर चोरट्यांनी फोडले ! पाथरीतील गणेशनगर भागात चोरट्यांचा सुळसुळाट !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – पाथरीचे एसडीएम सहकुटुंब बीडला गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी पाथरीतील गणेशनगर भागातील घर फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. त्यांच्याच बाजुला एका घरातही चोरट्यांनी हात साफ केला. एकूण २ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

यासंदर्भात पाथरीचे एसडीएम शैलेश श्रीनिवास लाहोटी (रा. गणेश नगर पाथरी ता. पाथरी जि. परभणी) यांच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, शैलेश काबरा यांच्या रोहाउस मध्ये मागील दीड वर्षांपासून किरायाने कुटुंबासह राहातात. दि. 28/06/2023 रोजी सायंकाळी अंदाजे 06:00 वाजताचे सुमारास एसडीएम शैलेश श्रीनिवास लाहोटी हे कुटुंबासह बीड येथे गावी गेले होते. जाताना पाथरीतील घराला कडी कोंडा व मुख्य दरवाजाला कुलुप लावून घर बंद केले होते.

दि. 29/06/2023 रोजी 02:00 वाजेच्या सुमारास गावी बीड येथे घरी झोपेत असताना एसडीएम शैलेश लाहोटी यांना गल्लीत गणेश नगर येथे राहाणार्या शेजार्याचा फोन आला. तुमच्या घराचा मुख्य दरवाजाचा कोंडा तुटलेला दिसत असून दरवाजा उघडा दिसत आहे.  सदरची माहिती फोनवर मिळताच सकाळी 08:45 वाजेच्या सुमारास बीड येथून गणेश नगर पाथरी येथे घरी पोहोचले. घराचा कोंडा तुटलेला दिसत होता. घराच्या आत पाहाणी केली असता बेड रुममध्ये भितीलगत असलेले लाकडी कपाट उघडे दिसले.

कपाटात ठेवलेले सामान, कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. सोन्याचांदीचे दागिने चोरीस गेले होते. एकूण- 2,34,300/- रुपयांचा मुददेमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी एसडीएम शैलेश श्रीनिवास लाहोटी यांच्या बाजूच्या घरातही चोरी केली. एकूण एकूण २ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी पाथरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!