देश\विदेश
Trending

शेतकऱ्यांनो, बँक खात्याशी आधार संलग्न करा ! पीएम किसान सन्मान निधीचा १४वा हप्ता गुरुवारी खात्यावर होणार जमा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.२५ -: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील 14 व्या हप्त्यातील (एप्रिल ते जुलै, 2023) देय लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) आधार संलग्न बँक खात्यावर वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार संलग्न करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

या समारंभास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारंभामध्ये कृषि विज्ञान केंद्रावर https://pmindiawebcast.nic.in या लिंकवरून सहभागी होता येईल.

या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) दोन हजार रुपये हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपयांचा लाभ अदा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार (दि. 27) रोजी सकाळी 11 वाजता देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर (राजस्थान) येथून ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे.

चौदाव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. फेब्रुवारी, 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात या योजने अंतर्गत 25 जुलै, 2023 अखेर 110.53 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 23 हजार 731.81 कोटी रक्कमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे.

या समारंभात दिनांक 1 एप्रिल ते दिनांक 31 जुलै, 2023 या कालावधीकरिता देय चौदाव्या हप्त्यावेळी राज्यातील एकूण 85.66 लाख पात्र लाभार्थ्यांना साधारण 1866.40 कोटी रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील 88.92 लाख लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत.

उर्वरीत सर्व लाभार्थी यांनी पीएम किसान योजनेचा लाभ जमा होण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी संबंधित बँकेत जाऊन आवश्यक अर्ज बँकेत सादर करून आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खरीप, 2023 हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदीसाठी चौदाव्या हप्त्याचा हा लाभ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरून कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!