राजकारण
Trending

घड्याळ चिन्हावर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका लढवणार ! अजित पवारांचा एकप्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दावा, काय म्हणाले दादा वाचा सविस्तर.. !!

मुंबई, दि. २ – महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपासोबत का नाही असा सवाल उपस्थित करून यापुढील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढणार असल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमच्यासोबत सर्व आमदार असल्याचा दावाही अजित पवार यांनी यावेळी केला. या निर्णयाला शरद पवारांची संमती आहे का या प्रश्नावर मात्र अजित पवारांनी थेट उत्तर न देता सर्वच आमच्यासोबत आहेत, असे म्हणून प्रश्नाला बगल दिली.

अजित पवार यांनी या प्रश्नाला उत्तरं देणं टाळलं शरद पवारांची या निर्णयाला संमती आहे का ? किती आमदार तुमच्या सोबत आहे ? सुप्रिया सुळे तुमच्या सोबत आहेत का ? या प्रश्नांवर अजितदादांनी थेट उत्तरे न देता गोलमोल उत्तरे दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची गैरहजेरी होती. यामुळे राजकीय गोटात चर्चेच्या फैरी झडत आहे.

आज दुपारी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथविधी घेतला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच भूकंप झाला. शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. या पत्रकार परिषदेला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे ही उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय आम्ही घेतला आहे. वरिष्ठांना विचारूनच हा निर्णय आम्ही घेतला आहे. विरोधी पक्ष नेते पदाचा शुक्रवारीच राजीनामा दिल्याचे अजित पवार म्हणाले. यापुढे घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट करून अजितदादा यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर दावा केला आहे.

आमच्यासोबत सर्व आमदार आहे. आकडा सांगायला तो काही मटक्याचा आकडा नाही. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासोबत आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. त्यानुसार बहुमत आहे. आमच्यासोबत सर्व आमदार आहेत. आता नविन नेतृत्व पुढं आल पाहिजे आणि महाराष्ट्राचे प्रश्न सुटले पाहिजे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपा सोबत जाण्यास इच्छूक असल्याचा संकेतही त्यांनी यावेळी दिला. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी निर्णय घेतला असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!