छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

मोबाईल नंबर व ईमेल नोंदवा, वीजबिल तात्काळ मिळवा ! वर्षाला 120 रुपये वाचवा !!

महावितरणचे ग्राहकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना महावितरणतर्फे दरमहा वीजबिल तयार होताच ऑनलाईन पाठविण्यात येते. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सर्व वर्गवारीतील 13 लाख 42 हजार 404 पैकी 12 लाख 91 हजार 466 अर्थात 96.21 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.

महावितरणने काही वर्षांपूर्वी केंद्रीकृत बिलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मोबाईल अॅपद्वारे प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 तारखेतील एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेतले जाते. त्यानंतर केवळ चार ते पाच दिवसांत वीजबिल तयार करून ते मोबाईलवर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे ग्राहकाला पाठविले जाते. त्यासाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची महावितरणकडे नोंदणी गरजेची आहे. विशेष म्हणजे अशा ग्राहकाला मोबाईल क्रमांक व ई-मेल या दोन्हीवरही दरमहा वीजबिल मिळविता येईल. छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील 3 लाख 57 हजार 137 पैकी 3 लाख 40 हजार 545, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील 6 लाख 32 हजार 213 पैकी 6 लाख 12 हजार 327 तर जालना मंडलातील 3 लाख 53 हजार 54 पैकी 3 लाख 38 हजार 594 ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली आहे.

वीजबिलाच्या तारखेपासून 7 दिवसांत भरणा केल्यास एक टक्का प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट मिळते. त्याची तारीख वीजबिलात नमूद असते. एसएमएस किंवा ई-मेलवर वीजबिल घेतल्यास ही सूट मिळविणे अधिक सोयीचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यास पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व युनिटची संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस याची माहिती मोबाईलवर येते. त्यामुळे सर्व ग्राहक तसेच जे वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत त्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे. काही ग्राहकांचे चुकीचे क्रमांक नोंदवलेले असू शकतात, अशा ग्राहकांनी आपला अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा. तसेच ज्या ग्राहकांना आधी नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल त्यांनीही नवीन क्रमांक नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी करा ई-मेल किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी

• महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण अॅपद्वारे मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करण्याची सोय आहे.

• वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून 9930399303 क्रमांकावर एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते.

• याशिवाय 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या टोल फ्री 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी करता येते.

‘गो-ग्रीन’मध्ये वर्षाला 120 रुपये वाचवा- ग्राहकांनी छापील वीजबिलाऐवजी फक्त ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत मिळते. वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होते. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ग्राहकांना ‘ई-मेल’वर पाठविण्यात येते, त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्‍ट पेमेंट’चा लाभ घेणे सहज शक्य आहे. ई- बिलामुळे कागदाचा वापर बंद होऊन पर्यावरण रक्षणासही हातभार लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गो-ग्रीनमध्ये 22 हजार 54 ग्राहक सहभागी आहेत. गो-ग्रीनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावरील जीजीएन (GGN) या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल अ‍ॅप किंवा https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp लिंकवर जाऊन करावी. अधिक माहिती www.mahadiscom.in वर उपलब्ध आहे. ग्राहकांना छापील बिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे दरमहा प्राप्त वीजबिल संगणकात जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. गरजेप्रमाणे ग्राहकांना ते कधीही पाहता किंवा प्रिंट करता येतात.

Back to top button
error: Content is protected !!