छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

लासूर स्टेशनच्या तत्कालीन कृषी पर्यवेक्षकाने भ्रष्टाचारातून ४८ लाखांची माया जमवली, पत्नी व मुलासह गुन्हा दाखल !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी तथा लासूर स्टेशनचे तत्कालीन कृषी पर्यवेक्षक यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली असून प्रथम दर्शनी 48,43,065/- किंमतीची बेहिशोबी मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 69.57% जास्त असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.

दत्तात्रय पितांबर गिरी (वय 59 वर्षे, सध्या सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी, तत्कालीन कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, वर्ग – 3),  त्यांची पत्नी व शशांक दत्तात्रय गिरी (वय 32 वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी, सर्व रा. घर क्र. 28, गट क्रमांक 82, लक्ष्मी विहार, देवळाई परिसर, बीड बायपास, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील लोकसेवक दत्तात्रय गिरी, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती मागविण्यात आली होती.

परंतु त्यांनी संपादित केलेल्या बेकायदेशीर मालमत्तेबाबत पुष्ठीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, पत्नी व मुलगा शशांक यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले. त्यांनी संपादित केलेली रू. 48,43,065/- किंमतीची बेहिशोबी मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 69.57% जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी लोकसेवक दत्तात्रय गिरी यांना त्यांची पत्नी व मुलगा शशांक गिरी यांनी मदत करून गुन्हयात प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे. म्हणून त्या सर्वांचे विरूध्द गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.

अरविंदकुमार भिमराव हिंगोले, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भाग्य नगर, जि. ,नांदेड गु.र.नं.  338/2023 कलम 13(1)(ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, सह कलम 109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!