छत्रपती संभाजीनगर

वाळूजमध्ये दरोडेखोरांचा व्यापाऱ्यांवर गोळीबार!; दोन राऊंड केले फायर, गर्दी वाढल्याने जीप सोडून पळाले…

संभाजीनगर, दि. १४ ः वाळूज एमआयडीसीतील पंढरपुरात काल, १४ डिसेंबर रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत रस्त्यावर गरमीचे कपडे विकणाऱ्या व्यापाऱ्यांत दहशत निर्माण केली. चार ते पाच दरोडेखोर होते. त्यांनी व्यापाऱ्यांवर गोळीबारही केला. यात दोन व्यापारी जखमी झाले आहेत. गर्दी वाढल्याने दरोडेखोरांनी जीप तिथेच सोडून पळ काढला.

औरंगाबाद- नगर महामार्गावर पंढरपुरात अब्बास पेट्रोल पंप परिसरात मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील काही व्यापारी गरम कपड्यांची दुकाने थाटून आहेत. स्वेटर्स, शाल, जॅकेट, हातमोजेंची विक्री करतात. काल रात्री ११ च्या सुमारास दुकाने बंद करताना औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ (क्र. एमएच २० एजी ६००१) त्‍यांच्याजवळ थांबली. कारमधून ४ ते ५ उतरले. त्यातील एकाने दुकानातील शाल घेतली. विक्रेत्याने पैसे मागितले असता ते देण्यास नकार देत दरोडखोर विक्रेता असिफ रसूल शहा (३२) याच्यासोबत भांडू लागले. त्‍याला मारहाण करू लागले. त्यामुळे शहांनी आरडाओरड सुरू केली.

हा प्रकार पाहून अन्य विक्रेते मदतीला धावले. चैनसिंग मांगीलाल बंजारा, मुकेश बंजारा व अन्य विक्रेत्यांनी दरोडेखोरांना अडवले असता त्यांनी त्यांनाही लाकडी दांडा, लोखंडी रॉड व हातोड्याने मारहाण सुरू केली. त्यामुळे विक्रेत्यांनी दरोडेखोरांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. संतापलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने विक्रेत्यांच्या दिशेने दोन राउंड फायर केले. मात्र गर्दी आणि गोंधळ वाढत असल्याने दरोडेखोर कार सोडून पसार झाले. या कारमध्ये मिरची पूड, धारदार चाकू, लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या आढळल्या आहेत. त्यामुळे ते कुठल्यातरी मोठ्या मोहिमेवर निघाले होते, असे दिसून येते.

दरोडेखोरांच्या मारहाणीत राजू गोवर्धन बंजारा (३२), मुकेश उर्फ भीमा नथुलाल बंजारा (३५) हे विक्रेते जखमी झाले आहेत. पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त अशोक थोरात, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक चेतन ओगले, धनराज राठोड, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश ढगे, योगेश शेळके, यशवंत गोबाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी रान पिंजले. चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Back to top button
error: Content is protected !!