पैठण
Trending

पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात माणसे फिरकेना, बकऱ्यांसाठी मोकळे रान ! बकऱ्या चरण्यास विरोध केला म्हणून सेक्युरिटी गार्डला मारहाण !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला सध्या अवकळा आली असून माणसे फिरकेनासे झालेले असतानाच बकऱ्यांसाठी मात्र मोकळे रान असल्याचे दिसून येते. बकऱ्या चरण्यास विरोध केला म्हणून सेक्युरिटी गार्डला पशूधन मालकाने मारहाण केल्याची घटना घडली. सेक्युरिटी गार्डला जबर मुका मार दिल्याने त्याला उपचार घ्यावा लागला.

तुकाराम मोहनराव गाडेकर (वय 48 वर्षे, सेक्युरिटी गार्ड, ज्ञानेश्वर उद्यान, पैठण, रा. गोदावरी कॉलनी पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) हे मागील पाच वर्षांपासून ज्ञानेश्वर उद्यान पैठण येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून नेमणुकीस आहे. सेक्युरिटी गार्ड तुकाराम मोहनराव गाडेकर हे दिनांक 14/03/2023 रोजी सकाळी 06.00 ते 02.00 पर्यंत ड्युटीवर असताना दुपारी 12.00 वाजेच्या दरम्यान नारळा येथील एक जण हा धरणाकडे जाणा-या रोडवरील गार्डनच्या भिंतीलगत असलेल्या झाडांमधून त्याच्याकडील बक-या चारण्यासाठी घेवून ज्ञानेश्वर उद्यानात जात होता.

तेव्हा सेक्युरिटी गार्ड तुकाराम मोहनराव गाडेकर हे त्यास समजावून सांगत होते की तुझ्या बक-या घेवून उद्यानात जाऊ नको उद्यानातील झाडे खराब होतील. असे समजावून सांगत असताना सदर व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या लाकडी दाड्यांने सेक्युरिटी गार्ड तुकाराम मोहनराव गाडेकर यांच्या उजव्या मांडीवर डाव्या गुडघ्यावर व उजव्या हाताच्या करंगळीला मारहाण करून मुक्कामार दिला.

तसेच लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तेथे जमलेल्या इतर लोकांकडून सदर व्यक्तीचे नाव बाळु बाबासाहेब अवधुन (रा. नारळा पैठण ता. पैठण) असे असल्याचे समजले. उपचार घेवून बरे वाटत असल्याने सेक्युरिटी गार्ड तुकाराम मोहनराव गाडेकर यांनीपोलीस ठाणे पैठण गाठले. बाळु बाबासाहेब अवधुन याच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पैठण पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!