छत्रपती संभाजीनगर
Trending

धक्कादायक: समृद्धी महामार्ग ५ इंच धसला, हडस पिंपळगाव ते जांभळा दरम्यान दोन लेनमधील ४९ फुटांच्या पाच ब्लॉकमध्ये डागडुजी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले असून एक ते दोन ठिकाणी हा रस्ता तब्बल ५ इंच धसल्याने या कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हडसपिंपळगाव ते जांभाळा दरम्यान डोनगाव येथे दोन लेनमधील पाच ब्लॉक ५ इंच धसल्याने/खचल्याने डागडूजीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, हा महामार्ग ट्यूब लेवल नसल्याने आणि आता तर काही ठिकाणी रस्ता खालीवर होत असल्याने वेगातील कार जम्पिंग होत आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील हडसपिंपळगावहून ते जांभाळाकडे येताना डोनगाव जवळ पार्किंग लेन आणि ट्रकच्या लेनमध्ये पाच ब्लॉक सुमारे पाच इंच खचल्याने खाबुगिरी उघडी पडली आहे. एक ब्लॉक तीन मीटरचा आहे. म्हणजे पाच ब्लॉक एकूण ४९ फूट रस्ता सुमारे ५ इंच खचला. यावरून या रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले असावे याचा अंदाज बांधता येवू शकतो. दोन लेन एक पार्किंग आणि दुसरी ट्रकच्या लेनमध्ये सध्या दुरुस्तीचे काम आटोपले असून सध्या क्युरिंग सुरु आहे. अजून एका ठिकाणीही असाच धक्कादायक प्रकार झाला आहे. याशिवाय या रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले असून ते तडे दुरुस्त करण्यात आले असल्याने हा रस्ता काही दिवसांनी थिगळांचा रस्ता झाल्यास नवल वाटायला नको.

रस्ता खाली-वर झाल्याने अनेक ठिकाणी कार जम्पिंग होताहेत…

रस्त्याच्या उंचीवरून सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्यात सापडलेल्या समृद्धी महामार्गासाठी प्रचंड प्रमाणात भरती लागली. जमीनीपासून हा रस्ता उंच घेण्यात आला खरा मात्र, या रस्त्यासाठीच्या भर्तीसाठी मुरुमाच्या नावाखाली अनेक ठिकाणी माती वापरण्यात आली असल्याने मातीमुळे हा रस्ता खचत असून ट्यूब लेवल कायम राहिलेली नसल्याने वेगातील गाड्या जम्पिंग होताहेत. या मामार्गावर तीन लेन असून एक पार्किंग लेनही आहे. पहिली लेन जड वाहतुकीसाठी ८० ची वेग मर्यादा या लेनवर आहे. मीडल लेन ही कारसाठी असून वेगमर्यादा ही १२० ची आहे तर ड्रायवरसाईडची लेन ही ओव्हरटेकिंगसाठी आहे.

समृद्धी महामार्ग सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात    

समृद्धी महामार्ग अगदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सुरुवातीला नावाचा वाद, त्यानंतर समृद्धी महामार्गाची उंची किती असावी याचा वाद. त्यानंतर भूसंपादनाचा आणि मावेजाचा वाद. ठेकेदाराचा वाद आणि आता अपघातामुळे सर्वात जास्त चर्चेच्या केंद्रस्थानी समृद्धी महामार्ग राहिला आहे. बुलढाण्याजवळ नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात घटनास्थळी २५ जणांच्या बळीनंतर या महामार्गातील त्रुट्यांवर सर्वात जास्त टीका झाली.

कामे अर्धवट असतानाही सरकारकडून उद्घाटनाटी घाई..

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे रोजी पार पडले. नागपूर ते शिर्डी महामार्ग सुरु करण्यास राज्य शासनाने घाई केली असा आरोप विरोधकांकडून झाला. अन् हे काही प्रमाणात सत्य असल्याची काही अपघाताची उदाहरणे म्हणून लक्षात येईल. प्रचंड वेगात असलेल्या गाड्यांसमोर बकर्या, कुत्रे व अन्य पशू येत असल्याने नियंत्रण जावून अनेक अपघात झाले. टीका झाल्यानंतर आता कुठे या महामार्गाला जाळी ठोकण्याचे काम सुरु आहे.

समृद्धी महामार्ग दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये – समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. शिर्डी ते इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० कि मी आहे. दुसऱ्या टप्प्यात ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.

Back to top button
error: Content is protected !!