छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ ठार, १५ जखमी ! एकाच कुटुंबातील तिघांचा मृतात समावेश, समृद्धीवरील अपघातांची मालिका थांबेना !!

टेम्पो ट्रव्हलर आणि ट्रकचा भीषण अपघात, ट्रकला पाठीमागून टेम्पो ट्रव्हलरची धडक

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५  – टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकच्या भीषण अपघात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली. समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळ अगरसायगाव परिसरात ही दुर्घटना घडली. नाशिक शहर व जिल्ह्यातील भाविक खाजगी टेम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ट्रकला टेम्पो ट्रव्हलर पाठीमागून धडकून हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती कळताच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटीत दाखल करण्यात आले आहे. १२ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबत नसल्याने सरकार ठोस उपाययोजना करणार आहे की नाही ? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अपघातातील मृतांची नावे-

तनुश्री लखन सोळसे (5 वर्षे समतानगर, नाशिक)
संगिता विलास अस्वले (40 वर्षे, वनसगाव, निफाड)
अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे रा रातुनगर नाशिक)

रमेश जमधडे (वय 45 वर्षे रा. संत कबीर नगर, नाशिक)
काजल लखन सोळसे (32 वर्षे, समतानगर, नाशिक)
रजनी गौतम तपासे (वय 32, गवळाणी नाशिक)

हौसाबाई आनंदा शिरसाठ (वय ७०, उग्गाव, ता. निफाड, नाशिक)
झुंबर काशीनाथ गांगुर्डे (राजूनगर नाशिक)
अमोद झुंबर गोगुर्डे (18 वर्षे राजूनगर नाशिक)

सारीता झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे, राजूनगर नाशिक)
मिलिंद पगारे (वय ५०, रा. कोकणगाव, ओझर, ता. निफाड, नाशिक)
दीपक प्रभागर केळाने (वय ४७, रा. बसतंत पिंपळगाव नाशिक)

पोलिसांची गाडी मागे लागल्याने अपघात ?
पोलिसांची गाडी मागे लागल्याने ट्रक आणि पोलिसांच्या गाडीत पाठशिवणीचा खेळ सुरु होता. दरम्यान, पोलिसांनी थांबवल्यामुळे ट्रक अचानक थांबल्याने टेम्पो ट्रव्हलर धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. समृद्धी सारख्या रस्त्यावर जर पोलिस अशा पद्धतीने कोणताही मगाचा पुढचा विचार न करता पाठलाग करत असतील अन् अपघातात मोठ्या संख्येने बळी जात असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. अत्याधुनिक यंत्रणा अन् आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाची टीमकी शासन वाजवून घेत आहे. केवळ टीमकी वाजवून चालणार नाही तर या आंतरराष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही चेक करून खरच पोलिसांची गाडी ट्रकच्या मागे लागली होती का ? याचा छडा लावला पाहिजे अशी जनतेची मागणी आहे. समृद्धी महामार्गावर खरच सीसीटीव्ही आहेत की सरकार केवळ बाता मारतं याचा उलगडाही होणे आवश्यक आहे. केवळ मोजक्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून संपूर्ण समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही लावल्याचा बाता मारणार्या सरकारचाही यामुळे पर्दाफाश होणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!