समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबेना, बाप-लेकीचा जागीच मृत्यू तर आईचा उपचारादरम्यान मृत्यू ! धावत्या आयशरला जालन्याची क्रूझर धडकली, जीपचा चेंदामेंदा !!
7 जण जखमी, जालना जिल्ह्यातील गोसावी पांगरीवर शोककळा
संभाजीनगर लाईव्ह, दि. १ : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना. मध्यरात्री जालन्याच्या क्रूझर जीपला भीषण अपघात झाला. यात बाप-लेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आईने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अन्य 7 जण जखमी झाले. जालन्याहून मुंबईला निघालेली क्रूझर जीप आयशरवर धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की क्रूझर जीपचा चेंदामेंदा झाला. शिर्डी जवळ कोकमठाण जवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
संतोष राठोड (वय 28), अवनी राठोड (वय 18 महिले), वर्षा राठोड (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. जालन्यावरून मुंबईला जाण्यासाठी राठोड कुटुंबीय क्रूझर जीपने (एमएच-22- एच-2523) प्रवासाला निघाले होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास क्रूझर जीप समोरील चालत्या आयशर गाडीवर जोरदार धडकली. या अपघातात क्रूझरमधील संतोष राठोड (28) आणि अवनी राठोड (वय 18 महिने) या बापलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आई वर्षा राठोड (27) यांनी उपचाादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तेजस पठाण (वय 25), शरद पवार (वय 38) आदींसह 7 जण किरकोळ जखमी झाले.
मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास चालकास डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून क्रुझर गाडी समोर असलेल्या आयशर गाडीवर धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात तिघांचा मृत्यू झाला. सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत तिघेही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथील रहिवासी आहे. या अपघातामुळे गोसावी पांगरी या गावावर शोककळा पसरली आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबवण्यात सरकार, प्रशासनाला अपयश आले आहे. मध्यरात्रीच दोन मोठे अपघात झाले. बुलडाणा जिल्ह्यात खासगी बसला अपघात होऊन 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून मन सुन्न करणार्या या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. यातच जालना जिल्ह्यातील क्रूझर अपघाताची यात भर पडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe