महाराष्ट्रराजकारण
Trending

अजितदादांची उघड नाराजी: मला विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यात फार रस नव्हता ! आता या पदातून मुक्त करून पक्ष संघटनेची जबाबदारी द्या !!

Story Highlights
  • ममता बॅनर्जी या एकट्याच्या जीवावर प. बंगाल घेऊ शकतात, केजरीवाल दोन राज्यांत सत्ता आणतात, नितीश कुमार यांनी बिहारमध्ये वर्चस्व निर्माण केले, आंध्र प्रदेशमध्य चंद्राबाबू नायडू, तेलंगणामध्ये बीआरएस पक्ष आपल्या ताकदीवर सत्ता आणू शकतो. या सर्व नेत्यांची नावं घेतली तर यात सर्वात उजवे नेते शरद पवारसाहेब आहेत..

मुंबई, दि. २२ – पवार साहेबांनी आणि पक्षाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मला विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यात फार रस नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या व त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळले पण आता मला या पदातून मुक्त करा आणि मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. यापुढे पक्षाने कोणतेही पद द्यावे, त्या पदाला न्याय द्यायचं काम करेन, अशी मागणी जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने राजकीय गोटात चर्चा झडत आहे. अजितदादा म्हणाले, १० जून १९९९ मध्ये शिवाजी पार्क येथील ऐतिहासिक सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हा मी, जयंतराव पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आर. आर. पाटील आम्ही सर्व ज्युनिअर मंडळी होतो. त्यावेळी छगन भुजबळ, मधुकर पिचड, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील या सर्वांनी पक्ष संघटना वाढवण्याचे काम केले. या २५ वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार आपण पाहिले. अनेक जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले. २५ वर्षांनी नवी पिढी पुढे येते. भाकरी फिरवली पाहिजे अशी अपेक्षा केली जात होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खा. प्रफुल पटेल व खा. सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तसेच इतर सदस्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. आता या सगळ्यांनी मिळून पक्ष मजबूत करायचा आहे.

पक्ष संघटनेत कोण जुने, कोण नवीन आले हे महत्त्वाचे नाही. संघटना पुढे नेताना सर्व जाती, धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन संघटना खऱ्या अर्थाने तळागळापर्यंत पोहचवण्याचे काम जो करतो तो पक्षाचा जीवाभावाचा सहकारी, पक्षाचा जीवाभावाचा नेता आहे. ज्यांच्याकडे संघटनकौशल्य, नेतृत्व आहे त्यांना पक्षामध्ये संधी मिळते. त्यात जातीपातीचा विचार केला जात नाही. स्व. आर. आर. पाटील यांच्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचू शकतो हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतो.

आज मंत्रिपद भूषविलेल्या नेत्यांनी, आमदारांनी पक्ष संघटनेच्या विविध भागांची जबाबदारी उचलली पाहिजे. उद्या जर कोणाला मंत्रिपद हवे असेल तर त्यांनी आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक निवडून आणले पाहिजेत. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वाची मदत घ्या. मिळालेल्या पदाचा वापर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी करायचा असतो. हा विश्वास येथे असणाऱ्या प्रत्येकाने उराशी बाळगला तर निश्चितपणे वेगळ्या प्रकारचे चित्र पाहायला मिळेल. पक्ष संघटना मजबूत करण्याकडे व वाढवण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन अजितदादांनी केले.

ममता बॅनर्जी या एकट्याच्या जीवावर प. बंगाल घेऊ शकतात, केजरीवाल दोन राज्यांत सत्ता आणतात, नितीश कुमार यांनी बिहारमध्ये वर्चस्व निर्माण केले, आंध्र प्रदेशमध्य चंद्राबाबू नायडू, तेलंगणामध्ये बीआरएस पक्ष आपल्या ताकदीवर सत्ता आणू शकतो. या सर्व नेत्यांची नावं घेतली तर यात सर्वात उजवे नेते ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत…पण आपण एकटाच्या ताकदीवर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष निवडून आणण्यात कमी पडलो. आपण विदर्भात, मुंबईत कमी पडतो. अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाही. आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे. २५ वर्षे मागे वळून पाहताना, आजचा आनंदाचा दिवस साजरा करताना, आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

आमदार नरहरी झिरवाळ, अमोल मिटकरी, अविनाश काकडे, अशोक काळे ‘वारी आपल्या दारी’ हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्ह्यांत तुकारामाची गाथा, पाईकांचे अभंग असे ग्रंथ वितरित करणार आहेत. सध्या देशात धार्मिक तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वास्तविक आपण सर्वांनी संविधानाप्रमाणे सर्वधर्मसमभावाचे सूत्र स्वीकारले आहे. तोच वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे माझी सर्व आमदार, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी व सेल प्रमुखांना विनंती आहे की, वारी आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्ताने तुकारामांची गाथा, निरुपण सोहळे आयोजित करावे. त्यामुळे समाजाचे प्रबोधन होईल. सामाजिक शांतता व सलोखा प्रस्थापित करायला मदत होईल. राज्यात जातीय दंगली घडवल्या जातात त्यामागील मास्टर माईंड कोण याचाही विचार आपण करायला हवा.

महिलांवर अत्याचार, बलात्कार अशा घटना वाढत आहेत. तसेच गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहे. हे रोखण्यात सरकार कमी पडते. आपली पोलिस यंत्रणा चांगली आहे. पण त्यांना मोकळीक मिळत नाही. त्यांच्या कामात हस्तक्षेप वाढलेला आहे. सरकार पोलिसांना स्वतःचे कार्यकर्ते असल्यासारखे वागवायला पाहतात. हे सर्व पाहल्यावर या गोष्टी महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभा देणाऱ्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राची देशात व राज्यात बदनामी होतेय. मुलींच्या वसतिगृहात मुलीची झालेली हत्या, चालत्या ट्रेनमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचार, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रियकराने प्रेयसीची केलेली हत्या या घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला छेद देणाऱ्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही, बेरोजगारी, महिला अत्याचार याबाबत काहीच बोलायला तयार नाही. याउलट ते आपल्या पक्षाला बदनाम करायचा प्रयत्न करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला मग तो शाब्दिक असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही अजितदादांनी यावेळी दिला.

१९९१ मध्ये मी लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलो. सहा महिने काम केले त्यानंतर ते सोडून मी महाराष्ट्रात आलो. आजपर्यंत आमदार, मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ही पदे भूषवली. पक्ष संघटना मजबूत असेल तर सर्व काही होते. आगामी निवडणुकीत बीआरएस आणि वंचित यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. मागच्या वेळी वंचितमुळे आघाडीला फटका बसला. समविचारी मतांची विभागणी झाली तर त्यामुळे अडचण येते. हे सर्व बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. यासाठीच बुथ कमिट्या सक्षम करण्याकडे लक्ष द्यायला हवे.

Back to top button
error: Content is protected !!