राजकारण
Trending

शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे ! पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून नवीन नेतृत्व घडवण्यावर भर देणार !!

शरद पवारच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार

मुंबई दि. ५ मे –संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर आज अखेर पडदा पडला.  कार्यकर्ते, जनतेचं प्रेम पाहून मी भारावून गेलो. माझ्या निर्णयानं असंख्य चाहत्यांमधून तीव्र भावना उमटली. त्यामुळे मी राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा ज्येष्ठ नेतेत शरद पवार यांनी आज सायंकाळी केली. वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांनी हे जाहीर केले.

पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, जबाबदारीतून मुक्त व्हावं ही माझी इच्छा होती. माझ्या निर्णयानं असंख्य चाहत्यांमधून तीव्र भावना उमटली. कार्यकर्ते, नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. देशभरातून या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केली. कार्यकर्ते, जनतेचं प्रेम पाहून मी भारावून गेलो. विविध पक्षांकडूनही राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे मी जाही केलेल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याची पवार यांनी जाही केले. याचबरोबर उत्तराधीकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. नवीन नेतृत्व घडवण्यावर माझा भर असेल, असेही पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सकाळी पार पडलेल्या समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली होती.

राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी शरद पवार कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा अशी मागणी प्रत्यक्ष करणार असल्याचेही प्रफुल पटेल यांनी सांगितले.

‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन समारंभात आदरणीय शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती असेही प्रफुल पटेल म्हणाले.

पवार यांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली. या समितीची आज बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला. त्यावर पवारसाहेबांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशाला, राज्याला, पक्षाला पवारसाहेबांची गरज आहे. पक्षाचे आधारस्तंभ तुम्हीच आहात. त्यामुळे पवार साहेबच पक्षाध्यक्षपदी असावे, अशी सर्वांची भावना असल्याचेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

Back to top button
error: Content is protected !!