बोगस रजिस्ट्री, पीआर कार्डद्वारे अस्तित्वात नसलेल्या फ्लॅटवर SBI ने डोळे झाकून दिले २८ लाखांचे कर्ज ! बँक मॅनेजर पहुरकर, व्हॅल्युअर गिरधारीसह चौघांवर गुन्हा दाखल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – अस्तित्वात नसलेल्या फ्लॅटवर तब्बल २८ लाखांचे कर्ज उचलून भारतीय स्टेट बॅंकेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी कर्जदारासह त्याच्याशी संगनमत केले म्हणून तत्कालीन बॅंक मॅनेजर, व्हॅल्यूअरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपालकृष्ण सचिद्रनाथ पृस्टी (वय 48 वर्ष व्यवसाय- नौकरी, सहाय्यक महाप्रबंधक, आरएसीपीसी भारतीय स्टेट बँक, प्लॉट नंबर 79, एन सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, भारतीय स्टेट बँक, एन १ सिडको येथील आरएसीपीसी विभागात सहाय्यक महाप्रबंधक म्हणून दि.9/5/2022 पासून ते काम करीत आहेत. त्यांच्या शाखेकडून गृहकर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यवसायीक कर्ज देण्यात येते. गृहकर्ज देण्यासाठी, ज्या घरासाठी, फलॅटसाठी कर्जाची मागणी केली आहे, ते घर / फलॅट नियमानुसार आहे किंवा नाही, ते घरकर्ज घेणाराचे नावे आहे किंवा नाही, घर / फलॅट यावर कोणाचा बोजा / तारण कर्ज नाही, मनपाची बांधकाम परवानगी, त्याचे मुल्यांकन किती आहे, कर्ज देताना प्रत्यक्षात स्थळपाहणी करण्यात येते.
कर्ज देण्या अगोदर ते घर/फलॅटचे गहाणखत/ तारण हे रजिस्ट्री कार्यालयातून करण्यात येते. त्यानंतर कर्ज मंजुर करण्यात येते. कर्ज वितरीत करताना कर्जाचे रक्कमेचा चेक हा कर्जदार याचे नावे न देता, ज्याचेकडून घर / फलॅट खरेदी करण्यात येत आहे त्याचे नावे देण्यात येतो अशी सर्वसाधारणपणे कर्ज वितरीत करण्याची पध्दत आहे.
दिनांक 6/9/2018 ते रोजी याहियाखान कैसरखान यांनी बँकेत दमडी महल एस. टी. कॉलनी, येथील सिटी सर्व्हे क्रं. 10871/18 वर बांधकाम केलेले अफनान अपार्टमेंट मधील फलॅट क्र.08 क्षेत्रफळ 58.24 चौ.मि. हा बांधकाम केलेला फलॅट बांधकाम व्यावसायीक अहमद निजामुद्दीन नुरुद्दीन मोहंमद यांचेकडुन खरेदी करण्यासाठी कर्ज मागणी अर्ज व कागदपत्र सादर केले होते.
कर्ज मागणी अर्जावरुन बँकेचे तत्कालीन बँक मॅनेजर पहुरकर यांनी प्रत्यक्ष सदनिकेची पाहणी केली. सदनिकेचे मुल्यांकन विनय दिनकरराव गिरधारी आर्किटेक्ट व्हॅल्युअर एसबीआय बँक, गिरीधारी शाह ऍण्ड असोसिएट यांचेकडून दिनांक 4/10/2018 रोजी करून अहवाल सादर केला. फलॅटची कागदपत्रे तसेच गिरधारी यांनी सादर केलेला मुल्यांकन अहवाल यावरून बँकेचे संबंधित अधिकारी यांनी दिनांक 26/10/2018 रोजी 28,67,000/- रुपये कर्ज मंजुर करून धनादेशाद्वारे अहमद निजामुद्दीन अहेमद यांचे नावे वितरीत केले.
अहेमद निजामुद्दीन यांनी दिनांक 20/11/2018 रोजी सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत 6256 अन्वये कर्जदार याहीयाखान कैसरखान यांचे हक्कात करून दिले. याहीयाखान यांनी कर्जाचे हमीपोटी बँकेच्या हक्कात फलॅटचे गहाणखत करून दिले. यावेळी दोन साक्षीदार यांनी सहया केलेल्या आहेत. याहियाखान कैंसरखान यांनी कर्जाचे हप्ते नियमीत भरणा न केल्यामुळे त्यांचे कर्जखाते हे एनपीए करण्यात आले. त्यानंतर बँकेचे अधिकारी यांनी फलॅट तपासणीसाठी प्रत्यक्ष भेट दिली असता त्या ठिकाणी फलॅट अस्तित्वातच नसल्याचे निदर्शनास आहे.
कर्जदार याहियाखान कैसरखान व बांधकाम व्यवसायिक अहेमद निजामुद्दीन मोहंमद यांनी जी मालमत्ता अस्तित्वातच नाही त्या मालमतेचे बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर कर्ज घेवून दिनांक 26/11/2018 रोजी बँकेस फलॅटची ताबा पावती लिहून दिली. दिनांक 6/9/2018 ते आज पावेतो 1) अहमद निजामोदयीन मोहंमद याहियाखान (वय 59 वर्षे रा. दमडीमहल, प्लॉटनंबर 12, फाजलपुरा) (2) याहियाखान कैंसरखान (वय 44 वर्षे रा. रोहिला गल्ली, सिटीचौक) यांचे दोघांमध्ये अफनान अपार्टमेंट, प्लॉट नंबर 12, दमडीमहल चे बांधकामामध्ये भागीदारी आहे. या बिल्डींगचे ए विंग मध्येग्राऊंड फलोअर, पहिला मजला दुसरा मजला व तिसरा मजला, असे तीन मजली इमारत ज्यामध्ये फलॅट क्रमांक ए- 1 ते ए- 6 असे सहा फलॅटचे बांधकाम झालेले आहेहे माहिती असतांनाही आपसात संगनमत करून इतरांचे मदतीने पी. आर. कार्डला नोंद घेवून अहमद निजामोद्दीन यांनी संगनमत करून अतित्वात नसलेला फ्लॅट क्रमांक ए- 8 ची रजिस्ट्री याहियाखान यांचेकडून करून घेवून बनावट कागदपत्रे तयार केली.
त्या बनावट रजिस्ट्री कागदपत्राचे आधारे एसबीआय बँकेत कर्ज मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले. बँकेचे व्हॅल्युअर आर्किटेक्ट (3) विनय दिनकरराव गिरधारी (वय 51 वर्षे रा. फलॅट नंबर ई-9, प्राईड इनीग्मा फेज-1 गारखेडा परिसर) व बँकेचे (4) तत्कालीन मॅनेजर पहुरकर ‘यांनी फलॅट अस्तित्वात नसतांना प्रत्यक्ष पाहणी करून फलॅट क्रमांक ए- 8 साठी एकूण 28,67,000/- रुपये कर्ज मंजुर करावे असा अहवाल सादर करून मालमत्ता गहाण कर्ज मंजुर करवून घेवुन बँकेची दिशाभुल व विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केल्याचे बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक गोपालकृष्ण सचिद्रनाथ पृस्टी यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या या तक्रारीवरून सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe