छत्रपती संभाजीनगर
Trending

एटीएममधून चोरी करण्याचा नवा फंडा ! मशीनमधून नोटा अर्धवट बाहेर येताक्षणीच लाईट बंद करून तब्बल २६ वेळा लावला सुंदरलाल सावजी बँकेला चुना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – चोरी करण्यासाठी चोरटे कोणता फंडा वापरेल हे कधी कधी कल्पनाशक्तीपलिकडे असते. असाच काहीसा कल्पनाशक्तीपलिकडचा फंडा चोरट्यानी लावला. एटीएम मशीनमधून नोटा अर्धवट बाहेर येताक्षणीच लाईट बंद कराययी आणि मशीनच्या विंडोमधून अर्धवट बाहेर आलेल्या नोटा खेचून काढायच्या. लाईट बंद केल्यामुळे तो व्यवहार पूर्ण होत नसे. हा फंडा या चोरट्यांनी एका दिवसात एकाच एटीएममधून तब्बल २६ वेळा वापरला. तब्बल 2,38,000/- रुपयांची फसवणुक या चोरट्यांनी बँकेची केली.

चोरीची ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.३० वाजेदरम्यान सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बँक शाखा जवाहरनगर कॉलनी औरंगाबाद येथे घडली. शाखाव्यवस्थापक किशोर बळीराम वैद्य (वय-51 वर्षे, काम- व्यवस्थापक- सुंदरलाल सावजी अर्बन को. ऑप बँक, शाखा जवाहर कॉलनी, औरंगाबाद. रा. पेठेनगर भाऊसिंगपुरा, औरंगाबाद) यांनी जवाहर नगर पोलिस स्टेशन गाठून काल रितसर फिर्याद दिली.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बँक शाखा जवाहरनगर कॉलनी या ठिकाणी आरोपीतांनी एटीएम कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकले. एटीएमद्वारे व्यवहार करण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी एटीएम मशीनला पुरवून रक्कम निघण्यासाठी एटीएम मशीनला निर्देशित केले.

रक्कम एटीएम मशीनच्या विंडोतून बाहेर निघते त्याच क्षणी आरोपींनी जाणीवपूर्वक एटीएम मशीनच्या बाजुस असलेल्या पॉवर सप्लायची पीन काढून एटीएम मशीनचा व्यवहार पूर्ण होण्यागोदरच मशीन बंद केली. परंतु आरोपींनी एटीएम मशीन बंद पाडण्यापूर्वी एटीएम मशीनच्या विंडोतील कॅश हाताने ओढून काढून घेतली.

आरोपींच्या या फंड्यामुळे म्हणजे ज्या वेळी पैसे बाहेर येतात अगदी त्याच वेळी पावर फेल करून (लाईट बंद करून) एटीएम मशीनच्या विंडोतून कॅश बाहेर निघत होती. व आरोपी एटीएमच्या विंडोतून रक्कम हाताने ओढुन काढीत होते. परंतु एटीएमचा संपूर्ण व्यवहार पूर्ण होण्या अगोदरच पावर फेल (लाईट बंद) होत असल्याने एटीएमच्या कार्डधारकाच्या खात्यात रक्कम कमी न होता ती रक्कम परत आपोआपच संबंधित खातेदाराच्या खात्यात परत जात होती. आरोपींनी तब्बल 26 वेळा एटीमचा पावर फेल करून बँकेची 2,38,000/- रुपयांची फसवणुक केली.

 सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बँकेचे शाखा व्यवस्थापक किशोर बळीराम वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जवाहर नगर पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञात चोरट्यांवर कलम ४२०, ३४ सह कलम आय टी अँक्ट ४३ (E)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजी तावरे करीत आहेत

Back to top button
error: Content is protected !!