महाराष्ट्र
Trending

सेलू येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्यांवर निलंबनाची कारवाई ! अनुदान वाटपात अनियमितता झाल्याचा ठपका !!

वर्धेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांचे निलंबन - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

नागपूर दि.८ : वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत केली. यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री उमा खापरे, प्रविण दरेकर, सचिन अहिर आणि प्रविण दटके आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.

यावेळी लोढा म्हणाले की, सेलू जि.वर्धा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांनी चौकशी समिती गठीत केली होती.

गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीने प्रशिक्षणार्थ्यांना नियमानुसार मंजूर निर्वाह भत्ता व विद्यावेतनाची रक्कम प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असताना सदर प्रशिक्षणार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध असताना सुद्धा रोख रक्कम अदा करण्यात आल्याचे संस्थेतील नोंदीवरून दिसून आले आहे.

चौकशी समितीने दिलेल्या अभिप्रायानुसार, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेलू जिल्हा वर्धा यांना कारणे दाखवा नोटीस दिनांक २८ नोव्हेंबर,२०२३ रोजी बजावण्यात आली आहे. त्याअनुषंगाने प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सेलू जि.वर्धा यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सेलू जि.वर्धा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांना निलंबित करण्यात येत आहे. तसेच शासन भ्रष्टाचार करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालणार नाही, असेही लोढा यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!