वीज कंपनीसमोर वीजबिल वसुलीसह अनेक आव्हाने ! संघटना व प्रशासनाने एकत्रितपणे काम केल्यास महावितरणची प्रगती: मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात संघटना व प्रशासन सुसंवाद बैठक
संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ : ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीजपुरवठा व विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरण सातत्याने कार्यरत आहे. आज कंपनीसमोर वीजबिल वसुलीसह अनेक आव्हाने आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी कर्मचारी संघटना व प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न केल्यास महावितरण आणखी प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील विविध कामगार व कर्मचारी संघटनाच्या बुधवारी (4 ऑक्टोबर) आयोजित बैठकीत डॉ.केळे बोलत होते. यावेळी ग्राहकसेवा, महसूलवाढ, अखंडित वीजपुरवठा, विद्युत सुरक्षा, वीज बचत, वीजचोरी व वीजगळती रोखणे, ऑनलाईन सेवांबाबत विविध संघटनांच्या केंद्रीय व परिमंडल स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून प्रशासन त्यांचा सकारात्मक विचार करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्य अभियंता डॉ.केळे यांनी दिली.
या बैठकीच्या निमित्ताने कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण काम करण्याचा संकल्प सर्वजण करूयात. संघटनांनी केवळ कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडवणुकीसोबतच धोरण ठरवण्यातही सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात आपल्यापासून केल्यास त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल. विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांद्वारे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यासाठी परिमंडल स्तरावर कर्मचाऱ्यांचे क्वालिटी सर्कल स्थापन करण्यात येईल, त्यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी नाशिक परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांचे ‘तणावमुक्ती व दैनंदिन कामकाज’ यावर विशेष व्याख्यान झाले. आजच्या युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकसेवेत बदल करून तत्पर सेवा देण्यास मदत होत आहे. यासंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करून या सर्व सेवांचा लाभ ग्राहकांना देण्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पहिल्यांदाच संघटनांशी सुसंवाद साधण्याचा उपक्रम परिमंडलात राबवण्यात आला.
त्यामुळे प्रशासन व संघटना यांच्यात जवळीक निर्माण होऊन छत्रपती संभाजीनगर परिमंडल राज्यात सर्वच आघाड्यांवर उच्चतम पातळी गाठेल, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी महावितरणच्या आरोग्य विमा योजनेच्या सहयोगी कंपनीचे प्रतिनिधी अमित गायकवाड यांनी योजनेबद्दलची सविस्तर माहिती देऊन महावितरण कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी, प्रवीण दरोली, मोहन काळोगे, उपमहाव्यवस्थापक प्रवीण बागुल, प्रभारी सहायक महाव्यवस्थापक स्वाती चव्हाण-गाडेकर, कार्यकारी अभियंता दीपक सोनोने, प्रभारी वरिष्ठ व्यवस्थापक नितीन पाडसवान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सय्यद जहिरोद्दिन, अरुण पिवळ, शीलरत्न साळवे, अविनाश साळवे, नवनाथ पवार, पांडुरंग पठाडे, कमलाकर दांडगे, गोलाजी नागरे, नारायण खरात आदी उपस्थित होते. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe