कन्नड
Trending

पिशोरचा मास्टरमाईंड विकायचा कमी किंमतीत मोटारसायकली, चोरीच्या तीन दुचाकीसह कन्नड नागापूरचे तिघे जेरबंद !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – ग्रामीण व संभाजीनगर शहर हद्यीतील चोरी गेलेल्या ०३ मोटार सायकल स्थानिक गुन्हे शाखेकडून हस्तगत करण्यात आल्या. चोरीचा माल घेणारे ०३ आरोपी जेरबंद करण्यात आले. मोटार सायकल चोरीच्या रेकॉर्डवरील पिशोर हद्दीतील सराईत चोरट्याने या मोटारसायकली चोरून नागापूर (ता. कन्नड) येथील तिघांना कमी किंमतीत विकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

अतुल शत्रुघ्न नवले (वय २३ वर्षे रा. डिगर पिशोर ता. कन्नड जि. औरंगाबाद) व प्रविण ज्ञानेश्वर तायडे (वय ३० वर्षे रा. नागापूर ता. कन्नड जि. औरंगाबाद), अमोल अशोक उपळकर (वय २४ वर्षे रा. नागापूर ता. कन्नड जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २४/०८/२०२२ रोजी फिर्यादी नारायण शामराव निकम (वय ५१ वर्षे, व्यवसाय शेती रा. किन्हळ ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांनी पोलीस ठाणे देवगांव रंगारी येथे फिर्याद दिली की, दिनांक २४/०८/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता देवगांव रंगारी येथे पोळ्याचा बाजार असल्याने ते त्यांची हिरो कंपनीची काळ्या लाल रंगाची एच.एफ. डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम. एच. २० एफ. ई-३७८५ घेऊन गेले होते.

बस स्टैंडजवळ त्यांनी गाडी लावली होती. त्यानंतर १२:३० वाजता नारायण शामराव निकम त्यांच्या मोटार सायकल जवळ परत आले असता तेथे मोटारसायकल दिसली नाही. मोटार सायकल चोरीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे देवगांव रंगारी येथे गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, हा गुन्हा मोटार सायकल चोरीच्या रेकॉर्डवरील पिशोर हधीतील सराईत चोरट्याने चोरलेली आहे. ती मोटारसायकल व आणखी दोन मोटार सायकल त्याने पिशोर येथील अतुल शत्रुघ्न नवले (रा. डिगर पिशोर ता. कन्नड जि. औरंगाबाद) व नागापूर येथील प्रविण ज्ञानेश्वर तायडे (रा. नागापूर ता. कन्नड जि. औरंगाबाद), अमोल अशोक उपळकर (रा. नागापूर ता. कन्नड जि. औरंगाबाद) यांना विकलेल्या आहेत. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींचा शोध घेतला.

आरोपी अतुल शत्रुघ्न नवले (वय २३ वर्षे रा. डिगर पिशोर ता. कन्नड जि. औरंगाबाद) व प्रविण ज्ञानेश्वर तायडे (वय ३० वर्षे रा. नागापुर ता. कन्नड जि. औरंगाबाद), अमोल अशोक उपळकर (वय २४ वर्षे रा. नागापूर ता. कन्नड जि. औरंगाबाद) हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, त्यांनी सदरच्या मोटार सायकल या पिशोर येथील त्यांचे ओळखीच्या व्यक्तीकडून कमी पैशात विकत घेतलेल्या आहेत. त्यांची कागदपत्रे आमचेकडे नाहीत, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

अतुल नवले याच्या ताब्यातून २५,०००/- रुपये किंमतीची एक हिरो कंपनीची काळ्या लाल रंगाची एच.एफ. डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम.एच. २०- एफ. ई-३७८५ मोटार सायकल व एक ३०,००० /- रुपये किंमतीची पॅशन प्रो मोटार सायकल क्रमांक एम.एच-२० डि.एक्स ४७३७ आरोपी क्र. ०२ व ०३ यांच्या ताब्यातून ३०,००० /- रुपये किंमतीची पॅशन प्रो मोटार सायकल ज्यावर बनावट क्रमांक एम.एच.२० ई.पी ७४८८ असा नंबर असलेली ज्याचा खरा आर.टि.ओ पासींग क्रमांक एम.एच-२० डि.एच-३५४३ अशा एकूण ८५,०००/- रुपये किंमतीच्या ०३ मोटार सायकल मिळून आल्या.

सदर मोटार सायकल बाबत खात्री केली असता पॅशन प्रो मोटार सायकल ज्यावर बनावट क्रमांक एम.एच.२० ई. पी- ७४८८ असा नंबर असलेली ज्याचा खरा आर.टि.ओ पासींग क्रमांक एम.एच-२० डि.एच-३५४३ याबाबत पोलीस ठाणे बेगमपुरा येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून सदरच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीतांना गुन्हयाच्या तपासकामी पोलीस ठाणे देवगांव रंगारी व पोलीस ठाणे बेगमपुरा यांच्या ताब्यात देण्यांत आले आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सफ बालू पाथ्रीकर, पोह दीपेश नागझरे, पोना गणेश गांगवे, नरेंद्र खंदारे, पोकों योगेश तरमाळे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!