महाराष्ट्र

जालन्यात युवकाच्या गळ्यावर ब्लेडने हल्ला, गल्लीतून मोटारसायकलने गेला म्हणून मारहाण !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- गल्लीतून मोटारसायकल का घेऊन आला म्हणून तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने पकडले तर दुसऱ्याने ब्लेडने गळ्यावर वार केले. ही घटना वस्तुभांडार जवळ, रहेमानगंज जवाहरबाग जालना येथे रात्रीच्या सुमारास घडली.

इरफान खान (वय २३, रा. रहेमानगंज, जवाहरबाग जालना) असे जखमीचे नाव आहे.  मस्तान खान मोदीन खान (वय 55 वर्षे, व्यवसाय हमाली रा. रहेमानगंज, जवाहरबाग जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते व त्यांचा लहान मुलगा इरफान असे दोघे नविन मोंढा जालना येथे हमालीचे कामकाज करतात. दि.3/12/2023 रोजी रविवार होता. त्यामुळे मोंढा मार्केट बंद असल्याने मस्तान खान व त्यांचा मुलगा इरफान दोघे घरीच होते.

रात्री 08.00 वाजेच्या सुमारास मस्तान खान यांचा मोठा मुलगा इम्रान खान घरी आला व त्याने सांगितले की, इरफान यास वस्तुभांडार जवळ, रहेमानगंज जवाहरबाग जालना येथून घराकडे मोटारसायकलवर येत असताना परिसरात राहणारे व ओळखीच्या मुलांनी शिवीगाळ करून मारहाण केली. गल्लीतून मोटारसायकल का घेऊन आला म्हणून त्यांनी वाद घातला.

एकाजणाने इरफान याला पकडून ठेवुन दुसर्याने त्याच्या हातातील ब्लेडने इरफानच्या गळ्यावर वार करून जखमी केले. इरफानला मारहाण होत असल्याने परिसरातील लोक धावून आले. यामुळे मारेकरी मुले पळून गेले. जखमीला रिक्षामध्ये घेऊन उपचाराकामी सरकारी दवाखाना जालना येथे पाठवण्यात आले.

याप्रकरणी जखमी युवकाचे वडील मस्तान खान मोदीन खान (वय 55 वर्षे, व्यवसाय हमाली रा. रहेमानगंज, जवाहरबाग जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रावन ससाने, सचिन ससाने, पंकज या तीन जणांवर एसबी जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!