वैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील झोलेगावमध्ये मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन ! केवळ ६०० रुपयांत स्वस्तात मिळणार वाळू, सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार !!

Story Highlights
  • शासनाने घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला
  • शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार

संभाजीनगर लाईव्ह, दि 20- शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, शासनाने घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार असून गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अवैध वाळू उपसा केल्याने होणारी पर्यावरणाची हानी आता या शासकीय वाळू केंद्रामुळे नक्कीच कमी होणार आहे.

या उपक्रमात परिवहन विभागाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या विभागाने वाळू वाहतूकीचे दर कमी केल्यास सामान्य माणसाला आणखी फायदा होईल. शासनाने स्वस्तात वाळू उपलब्ध करून दिल्याने घराच्या किंमती देखील कमी होतील असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर लाईव्ह गुगल अ‍ॅप इन्स्टॉल करा

Back to top button
error: Content is protected !!