छत्रपती संभाजीनगर

भांडून मध्यरात्रीच पत्‍नीला घराबाहेर काढले… सकाळी दिसले हे धक्कादायक चित्र…; माळीवाड्यातील घटना

संभाजीनगर, दि. १३ ः भांडून पत्‍नीला घराबाहेर काढल्यानंतर ३२ वर्षीय युवकाने घरात पत्र्याच्या खाली असलेल्या लाकडाला मफलरने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना काल, १२ डिसेंबरला सकाळी माळीवाडा (ता. औरंगाबाद) येथे घडली.

शंकर वसंत साठे (रा. गौतमनगर, माळीवाडा) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. रविवारी रात्री त्‍याचा पत्‍नीसोबत वाद झाला होता. त्याने पत्‍नीला घराबाहेर काढले. त्‍यामुळे त्‍याची पत्‍नी दोन्ही मुलांना घेऊन गावातच राहणाऱ्या आईकडे जाऊन झोपली.

सकाळी शंकरचे वडील त्‍याच्या घरी आले, पण शंकर दरवाजा उघडत नव्हता. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्‍यांनी खिडकीतून डोकावले असता शंकरने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्‍यांनी दौलताबाद पोलिसांना कळवले. शंकरच्या पश्चात आई, वडील, पत्‍नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

सहा महिन्यांपूर्वी शंकरचा लहान भाऊ महेंद्रनेही आत्‍महत्‍या केली होती. त्यानंतर शंकरनेही टोकाचे पाऊल उचलल्याने साठे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दौलताबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!