जालन्यातील तृतीयपंथी युवकावर विविध शस्रक्रिया करून स्री बनवले, पुण्यात पैसे मागण्यास भाग पाडले ! बळजबरीने लिंग परिवर्तन करून खंडणी उकळण्यास भाग पाडणारी टोळी सक्रिय ?
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – जालना शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तृतीयपंथी युवकाला पुण्यात काम देण्याची थापा मारून घेऊन गेले. तेथे त्याच्यावर विविध शस्रक्रिया करून त्यास स्री बनवण्यात आले. त्यानंतर तेथे त्याला लोकांसमोर पैसे मागण्यास भाग पाडले. त्या युवकाने अनेकदा त्या टोळीच्या तावडीतून सुटकेचा प्रयत्न केला मात्र, त्याच्यावर सतत वॉच असायचा. याच काळात त्या टोळीने त्याला जालन्यात आणले आणि त्याचवेळी त्याच्या आईने त्याला शोधून काढले. त्यानंतरही या टोळीने त्याचा माग सोडला नाही. त्याच्यावर हल्ला चढवला. हा हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही या टोळीने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जखमी केले. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे.
याप्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून २६ जणांवर कदीम जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे. २५ वर्षीय युवकाने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, तो जालन्यातील रहिवासी आहे. दोन अडीच वर्षांपूर्वी त्याला आरोपींनी पुणे येथे कामाला चल म्हणून पुण्याला घेऊन गेले परंतु तेथे कामाला कोठेही न जाऊ देता आरोपींनी त्या युवकावर विविध शस्त्रक्रिया केल्या व त्याला स्त्री बनवले.
तेथे त्याला लोकांसमोर पैसे मागण्यास भाग पाडले. तेथून पळून येण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला परंतु आरोपी त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेऊन होते व त्यांनी त्याला पळून येऊ दिले नाही. त्यानंतर आरोपींनी त्याला जालना येथे आणले परंतु त्याला त्याच्या घरी जाऊ दिले नाही. त्यानंतर एक वर्षानंतर त्या युवकाच्या आईने त्याचा शोध घेऊन त्याला आरोपींच्या तावडीतून सोडवले व तो त्याच्या घरी राहू लागला.
परंतु आता आरोपी त्याला दर महिन्याला 10,000 रुपये खंडणी मागत आहेत व त्यासाठी त्याला त्रास देत असून जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. याचाच भाग म्हणून दिनांक 15/03/2023 रोजी तो युवक कन्हैयानगर भागात असताना आरोपींसोबत आणखी पंधरा ते वीस लोक आले व त्यांनी युवकाला रस्त्यात गाठून मारहाण केली. त्यामुळे तो जखमी झाला. युवकाच्या सोबत असलेल्या सहकाऱ्याने त्याला शासकीय रुग्णालय जालना येथे दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास रुग्णालयात आरोपी व अनोळखी पंधरा ते वीस लोकांनी चक्क रुग्णालयातच प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी युवकाला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोणीही मध्यस्थी केली नाही.
दरम्यान, आता हे प्रकरण पोलिसांत पोहोचले असून त्या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून २६ जणांच्या या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ६ संशयितांची नावे त्याने पोलिसांना दिली असून उर्वरित २० जण हे ६ जणांच्या टोळीतील आहेत का ? याचा तपास कदीम जालना पोलिस करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe