महाराष्ट्र
Trending

शाळेतील तांदळाची किराणा दुकानात विक्री, गुन्हा दाखल ! पोलिस स्टेशनमध्येच मागितली ५० हजारांची लाच, सापळ्याचा संशय आल्याने हवालदार पुरावा घेवून पळाला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारा तांदुळ त्यांचे पालक किराणा दुकानात विकतात. किराणा दुकानदार हाच तांदुळ अहमदनगरच्या एका व्यापार्याला विकतात. याप्रकरणात पोलिसांनी धाड टाकून काळ्या बाजारातील तांदुळ पकडून कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. यातील तक्रारदाराला पोलिस स्टेशनमध्येच लाच मागणी करतानाच्या पडताळणीत पोलिस हवालदार अडकला. परंतू त्यानंतर तक्रारदाराकडून लाचेची ५०,०००/- रुपयांची रक्कम घेत असताना त्या हवालदाराला संशय आल्याने व्हाईस रेकॉर्डरचा पुरावा घेवून तो हवालदार पळून गेल्याची घटना अहमदनगरमधील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये घडली.

एकनाथ पंडित निपसे (पोलीस हवालदार, बक्कल नं.१४६६, वर्ग-३ नेमणुक कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे त्यांच्या राहत्या गावी किराणा दुकान आहे. ते किराणा सामान व धान्य विक्री करतात. तसेच गावातील काही लोक मुलांना शाळेत मिळालेला तांदुळ त्यांच्या दुकानात विकतात. असा विकत घेतलेला तांदुळ ते नगर मार्केट यार्ड मधील एका व्यापा-याला विकतात.

मागील तीन चार महिन्यांपूर्वी सदर व्यापारी याच्या दुकानावर कोतवाली पोलीसानी धाड टाकून त्यांच्याकडील काळ्या बाजारातील तांदुळ मिळून आला म्हणून गुन्हा दाखल केला होता. त्यास अटकही करण्यात आली होती. अटके दरम्यान त्या व्यापा-याने तक्रारदार यांचेकडून तांदुळ विकत घेतल्याचे सांगितलेवरून आरोपी एकनाथ पंडित निपसे (पोलीस हवालदार, बक्कल नं.१४६६ वर्ग-३, नेमणुक कोतवाली पो.स्टे., जि. अहमदनगर) याने तक्रारदार व त्यांचे मुलास दि.१६/ २ / २०२३ रोजी बोलावून घेतले.

त्यांच्या मुलास या गुन्हयामध्ये आरोपी न करणेसाठी व अटक न करणेसाठी ५०,००० /- रुपयांची मागणी केली अशा आशयाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १६/ २ / २०२३ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी एकनाथ पंडित निपसे याने तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपयांची मागणी केली.

दरम्यान आरोपी निपसे यास तक्रारदार व पंच यांचे बाबत संशय आल्याने आरोपी निपसे याने तक्रारदार यांना एका खोलीत नेऊन दरवाजा बंद करून त्यांची अंगझडती घेतली असता त्यास तक्रारदार यांचे कपडयांच्या आतमध्ये लपविण्यात आलेले डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर मिळून आले ते व्हॉईस रेकॉर्डर आरोपी निपसे याने तक्रारदार यांचेकडून बळजबरीने हिसकावून घेऊन पोलीस स्टेशन मधून पळून गेला.

आरोपी निपसे याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही म्हणून त्यांचेविरुध्द तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे लाचेची मागणी करणे, व्हॉईस रेकॉर्डर बळजबरीने हिसकावून घेऊन पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!