राजकारण
Trending

पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडल्याने दौरा अर्धवट सोडून जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो, मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्या: अजित पवार

माध्यमांनी विनाकारण बदनामी करणे थांबवावे; खात्री करुनच यापुढे माध्यमांनी बातम्या द्याव्यात

Story Highlights
  • तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन विश्रांती घेत होतो; माझ्याविषयी चुकीच्या बातम्या चालविल्यामुळे व्यथीत झालो

मुंबई, दि. ८ एप्रिल – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो, मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या दाखवण्याची सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केली आहे.

काल शुक्रवारी पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकुल परिणाम माझ्या तब्येतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले.

त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो अशा शब्दात आपली नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही, असे स्पष्ट सांगतानाच माध्यमांनी खात्री करुनच यापुढे बातम्या चालविण्याची सूचना अजित पवार यांनी माध्यमांना केली.

Back to top button
error: Content is protected !!