महाराष्ट्र
Trending

शेतकऱ्यांना दिलासा: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांना लाभ !

कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि. 24: शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २३ हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती योजनेचे अंमलबजावणी प्रमुख तथा कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजे पती, पत्नी व १८ वर्षांखालील अपत्यांना रुपये २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे ३ हप्त्यात रुपये ६ हजार दरवर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. लाभार्थ्यांनी संबंधित तहसिलदार तथा तालुका नोडल अधिकाऱ्यांकडून भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करुन घ्याव्यात.

पीएम किसान पोर्टलवरील http://pmkisan.gov.in या लिंकच्या आधारे केवायसी पडताळणी करावी. या योजनेतील लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र राहतील. उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अधिकचे मिळणार आहेत. त्यांच्या खात्यात एकूण ६ अधिक ६ असे१२ हजार रुपये जमा होतील, अशी माहितीदेखील चव्हाण यांनी दिली.

यात केंद्र शासनाकडून योजनेच्या एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीतील १४ वा हप्ता मे महिन्यात देण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या भूमि अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्यावत करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे व ई केवायसी प्रमाणीकरण करणे आदी बाबींची पूर्तता ३० एप्रिल २०२३ पूर्वी करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!