भारतीय बहुजन चळवळीचे शाहु महाराज प्रेरणास्त्रोत: डॉ.सुधीर गव्हाणे
सामाजिक न्यास दिनानिमित्त व्याख्यान
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा, वंचितांना आरक्षण व महिलांना समानतेचा अधिकारी देणारे राजर्षि शाहु महाराज हे ’समताधर्ती राजे होते. तसेच दक्षिणेतील पेरियार, उत्तरेतील बहुजन समाजाच्या चळवळीचे प्रेरणास्त्रोत देखील शाहु महाराज हेच होते, असे प्रतिपादन माजी कुलगुरु माध्यम तज्ज्ञ डॉ.सुधीर गव्हाणे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षि शाहु महाराज जयंतीनिमित्त महात्मा फुले सभागृहात सोमवारी (दि.२६) कार्यक्रम झाला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, संचालक डॉ.कावेरी लाड, डॉ.पराग हासे यांची मंचावर उपस्थिती होती. राजर्षी शाहु महाराज अध्यासन व वसंतराव नाईक अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय दिन व ’कृषि-तंत्रज्ञान सप्ताह’ २६ जून ते १ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन व ’समाजधर्मी राजर्षि शाहु महाराज’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुधीर गव्हाणे यांची व्याख्यान झाले. यावेळी ते म्हणाले, राजर्षि शाहु महाराज यांनी संपूर्ण मराठी भागात ब्राम्हणेत्तर चळवळीला खंबीर पाठिंबा दिला. शारीरिक क्षमता व बौध्दिक कौशल्य या दोन्हीतही ते पारंगत होते. महात्मा फुले यांनी महाराष्ट्रांच्या पुरोगामी परंपरेचा पाया रचला. शाहु महाराजांनी या संदर्भात कायदे करून समतेचे राज्य निर्माण केले. तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या दोन्ही महापुरंषाच्या प्रेरणेतून ’समता,बंधुता, धर्मनिरपेक्षा, सामाजिक न्याय’ ही मुल्ये असणारे संविधान निर्माण केले.
शाहु महाराज हे सम्राट अशोकानंतर समाज परिवर्तनासाठी राज्य चालविणारा राजा होता. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या ’रयतेचे राज्य’ शाहु महाराजांनी कोल्हापूरात आपल्या कृतीतून अस्तित्वात आणले. अशा या समताधर्मी शाहु महाराजांनी ३४ समाज घटकासाठी बोर्डिंग काडून शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजात रुजविली. अशा महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि आखिल भारतीय ठरलेला हा राजा ’कर्ता महापुरुष’ होता. त्यांचा वसा आणि वारसा आपण नेटाने पुढे नेऊ असेही डॉ.गव्हाणे म्हणाले.
जयंतीनिमित्त आठवाड्याभरात वक्तृत्व स्पर्धा (२७ जून), निबंध स्पर्धा (२९ जून), चर्चासत्र (३० जून), या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रास्ताविकात डॉ.कावेरी लाड यांनी दिली. डॉ.दैवत सांवत यांनी सूत्रसंचालन तर प्रा.पराग हासे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर, रासेयो संचालक डॉ.सोनाली क्षीरसागर, अधिसभा सदस्य डॉ.भास्कर साठे, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ.ओमप्रकाश जाधव, डॉ. नामदेव सानप यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यासने जातीपाती बाहेर काढली
महापुरुषांचे विचार आणि कृती ही संपूर्ण समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारी असते. त्यामुळे त्यांना जात, धर्म, प्रदेशाच्या चौकटीत ठेवणे चुकीचे असते. विद्यापीठात १५ अध्यासने कार्यरत असून पुर्वी संबंधित महापुरुषांच्या जातीतील संचालकांची नियुकती करण्याचा पायंडा मोडला. महापुरुषांच्या विचारांच्या अभ्यास मंडळ अध्यासनांचे संचालक पद दिले. या केंद्राच्या माध्यमातून मुलभूत संशोधन विस्तार कार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe