पुण्याला पेट्रोल आणि डिझेल पासून मुक्ती देणार, हायड्रोजन हे भविष्यातील प्रमुख इंधन ! कचऱ्यापासून वीज बनवण्या ऐवजी हरित हायड्रोजन बनवण्याच्या प्रकल्पाचा विचार करा- नितीन गडकरी
देशाचे विकास केंद्र असणाऱ्या पुण्याला पर्यावरण पूरक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
- पुण्यातील एनडीए चौक येथील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड मंचर बाह्यवळण प्रकल्पाचे लोकार्पण
पुणे, दि. 12 – देशाच्या विकास प्रक्रियेत पुण्याचे स्थान महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले पुणे हे ऐतिहासिक वारसा स्थळ आहे, इतिहास, संस्कृती आणि वारसा यांचे वैभवशाली प्रतीक असलेल्या पुणे शहराला प्रदूषणाच्या कचाट्यातून वाचवण्याची आज खरी गरज आहे. पुण्याला पेट्रोल आणि डिझेल पासून मुक्ती देऊन इलेक्ट्रिक त्याचबरोबर इथेनॉल सारख्या प्रदूषण विरहित इंधनावर चालणारी सार्वजनिक वाहतूक प्रणाली देण्याची आवश्यकता असून राज्य सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. हायड्रोजन हे भविष्यातील प्रमुख इंधन असून कचऱ्यापासून वीज बनवण्या ऐवजी हरित हायड्रोजन बनवण्याच्या प्रकल्पाचा विचार करा अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केली.
पुण्यातील एनडीए चौक येथील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प त्याचबरोबर खेड मंचर बाह्यवळण प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अत्यल्प किमतीत, दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याचे आवाहन श्री गडकरी यांनी यावेळी केले . त्याचबरोबर देशाचे विकास केंद्र असणाऱ्या पुण्याला पर्यावरण पूरक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले .
पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या एनडीए चौक परिसरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल व इंटरचेंज प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले . १६.९८ किमी लांबीच्या व ८६५ कोटी रुपए किंमतीच्या या पुलामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा मुख्य प्रश्न सुटणार आहे. एकूण १६ किमी लांबीच्या या प्रकल्पांतर्गत २.२ किमी लांबीच्या इंटरचेंजचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-बंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूंस २-लेन अंतर्गत आणि २-लेन बाह्य सेवेसाठी आहेत. एकाच इंटरचेंजमधून वेगवेगळ्या ८ दिशांना जाण्यासाठी एकूण ८ रॅम्प बनवण्यात आले आहेत, जे विविध भागांना मजबूत कनेक्टिव्हिटी देतील.
वाहन उद्योग क्षेत्रात भारत प्रथम स्थानावर आणण्याचा निर्धार व्यक्त करतानाच त्यात पुण्याचे स्थान फार महत्वाचे राहणार असल्याने पुण्याला देशाचे प्रमुख विकास केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले .
रस्तासुरक्षा विषयक बैठक- महाराष्ट्रातील विविध राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तज्ञांच्या मदतीने व्यापक उपाय योजना करण्यात येतील असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात झालेल्या रस्तासुरक्षा विषयक बैठकीत स्पष्ट केले. पुण्यातील एन डी ए चौकातील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सुरुवातीला रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामागची कारणे याविषयी सादरीकरण करण्यात आले . रस्त्यांवरील अपघातांना दरवेळी मानवी चूकच जबाबदार असते असे नाही तर अपघातग्रस्त वाहनांमध्ये असणारी तांत्रिक चूक . रस्ते बनवण्याच्या कामात राहिलेली त्रुटी यामुळे देखील अपघात घडू शकतात हे या सादरीकरणातून स्पष्ट झाले.
त्यानंतर मार्गदर्शन करताना गडकरी यानी वाहन निर्मिती उद्योगातील तज्ञ त्याचबरोबर रस्ता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने व्यापक उपाय योजना करण्याची सूचना केली. महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना करतानाच ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर देखील आवश्यक ते उपाय योजण्याची सूचना केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe