छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

दारू पिवून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश ! रात्री उशीरापर्यंत हॉटेल, बार सुरु राहिल्यास सिल ठोकणार !!

दारुबंदी व परिवहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, दि.३० :-जिल्ह्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ व मोटार परिवहन कायदा १९८८ मधील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करुन नियमभंग करणारे मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक, वाहन चालक, व्यक्ति यांच्याविरुद्ध कडक कारवाई करा,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील तरतुदींच्या अधिन राहून व्यवहार करणे बंधनकारक आहे.अशा तरतूदींचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. त्यात अनुज्ञप्तीधारकांच्या दुकाने- आस्थापना उघडणे व बंद करण्याच्या वेळेचे पालन करण्याबाबत, तसेच परवानाधारक व्यक्तिसच मद्य वितरण करणे, किमान २५ वर्षे वय असलेल्या व्यक्तिस मद्य व २१ वर्षे वय असलेल्या व्यक्तिस सौम्य बियर, सौम्य मद्य वितरण करणे तसेच विना परवाना मद्य बाळगणे व सेवन करणे, अशा व्यक्तिस मद्य वितरण करणे असे नियमबाह्य कृत्य करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांना व व्यक्तिंवर कारवाई करावी.

तसेच मोटार परिवहन कायदा १९८८ अन्वये मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्यात यावी. परमिटरुम मधून मद्यप्राशन करून मद्याच्या अंमलाखाली वाहन चालविणार नाही याबाबत संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी आपापल्या अनुज्ञप्तीत नोटीस बोर्ड लावून जनजागृती करावी.

विहित वेळेनंतरही अनुज्ञप्ती सुरु ठेवणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांची अनुज्ञप्ती महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ५४ व ५६ नुसार कायस्वरुपी रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करावी. तसेच खुल्या जागेत मद्य विक्री करण्याचे प्रकार घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करावी व संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी,असे आदेशात नमूद केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!