म्हाडाच्या घरांच्या किंमतीत कपात, सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
'म्हाडा' च्या मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
मुंबई, दि. २८ : ‘म्हाडा’ च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
म्हाडाच्या मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला दि. १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. नवीन व मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला गृहसाठा म्हणून सदनिका प्राप्त असून अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी, उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री.सावे यांनी सांगितले.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ व पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्मिती करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे (Mascot)अनावरणही सावे यांच्या हस्ते आज म्हाडा मुख्यालयात करण्यात आले.
यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार पी. डी. साळुंखे, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी, विधी सल्लागार मृदुला परब, उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.
प्राप्त अर्जाची संगणकीय सोडतीचा दिनांक व ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe