छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरात आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातून मुलीचे अपहरण!

संभाजीनगर, दि. १४ ः होस्टेलमधून कॉलेजमध्ये गेलेली १६ वर्षीय मुलगी परतीलच नाही. तिच्या मोठ्या बहिणीने या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ही मुलगी आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहत होती. ती मूळची नंदूरबार जिल्ह्यातील आहे.

मुबारखपूर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील दोघी बहिणी संभाजीनगरात शिकण्यासाठी आलेल्या आहेत. दोघी शासकीय वसतिगृहात राहतात. मोठी २० वर्षीय बहीण एमजीएममध्ये जीएनएमचे शिक्षण घेत असून, लहानी १६ वर्षीय मुलगी सिडको एन ३ भागातील एका विद्यालयात शिकते.

९ डिसेंबरला सकाळी सातच्या सुमारास मोठी बहीण कॉलेजला निघाली असता १६ वर्षीय मुलीने सांगितले, की ती कॉलेजला जाऊन भावाच्या खोलीवर मुकुंदवाडीत जाणार आहे व तेथून गावाकडे जाणार आहे. सायंकाळी सहाला जेव्हा मोठी बहीण होस्टेलवर परतली तेव्हा तिने भावाला फोन करून बहीण तिकडे येऊन गेली का, असे विचारले. तेव्हा त्‍याने ती आलीच नाही, असे सांगितले.

मोठ्या बहिणीकडे अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली तेव्हा त्यांनीही ती कॉलेजला आज आलीच नव्हती, असे सांगितले. ती घरीही पोहोचली नव्हती. त्यामुळे तिचा शोध घेण्यात आला. मात्र मिळून आली नाही. गावाकडे घरी जाण्यासाठी ती होस्टेलमधून निघाली पण पोहोचलीच नाही.

तिला कुणीतरी पळवून नेल्याचे मोठ्या बहिणीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, तिचा शोध घेतला जात आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक डोईफोडे करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!