आदर्श नागरी पतसंस्था घोटाळा: हृदयविकाराच्या झटक्याने 8 ठेवीदारांचा मृत्यू, दोघांची आत्महत्या ! अजून किती मृत्यू बघावे लागतील ? पतसंस्थेच्या संचालकांसह डीडीआरचे संचालक मंडळ, कर्मचारी सदस्य व लेखा परीक्षकावर गुन्हा दाखल करा: खा. इम्तियाज जलील
आदर्श नागरी पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांचे पोलिस आयुक्तांना प्रश्न
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- हृदयविकाराच्या झटक्याने अथवा ब्रेन हॅमरेजमुळे आधीच 8 ठेवीदारांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यात दोन पीडितांनी आत्महत्या देखील केलेली आहे. अजून किती मृत्यू बघावे लागतील ? या सर्व मृत्यूला जबाबदार कोण? या आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरुन डीडीआरचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी सदस्य आणि लेखा परीक्षक / सीए यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा अशी मागणी करून आदर्श नागरी पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीवर खा. इम्तियाज जलील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यानी एसआयटी टीम मार्फत सुरू असलेल्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करून त्यासंबंधी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना पत्र पाठविले.
खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आदर्श नागरी पतसंस्थेच्या पीडित ठेवीदारांच्या वतीने आम्ही सर्वजण आपल्या विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी), आपल्या सक्षम देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासाच्या सद्यस्थितीबद्दल चिंतित आहोत. परंतु असे काही प्रश्न आहेत जे उपस्थित करणे आवश्यक आहे.
या प्रकरणी अद्यापपर्यंत डीडीआर कार्यालयातील एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही. ज्या लेखापरीक्षकांची प्राथमिक जबाबदारी ही सोसायटीतील गैरप्रकारांवर आळा घालणे आणि संबंधित विभागांना तत्काळ अहवाल देणे ही होती, त्यांनाही सोडण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्या अटकपूर्व जामीनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ दिला जात आहे, ही विडंबना आहे आणि तसंच झालं.
गुन्हे शाखेतील अनेक अधिकारी आपल्या एसआयटीला मदत करत असल्याचे आपण सांगितले होते हे आम्हाला चांगलेच आठवते. मग मुख्य आरोपी चेअरमन मानकापे यांच्या काही सूत्रधार व कुटुंबीयांना अटक का झाली नाही? हे स्पष्ट संकेत मिळत आहे की, ते आपल्या टीमपेक्षा खूप हुशार आहेत, म्हणूनच ते सहजपणे अटक टाळू शकतात आणि औरंगाबादच्या संपूर्ण पोलिस खात्याची चेष्टा करू शकतात.
काही आरोपींना अटक झाल्यानंतर लगेचच ते जामिनावर सुटण्यासाठी न्यायालयात धाव घेतात, हे पोलीस कसे न्याय देऊ शकतात? फिर्यादी पक्षाचे काय म्हणणे आहे आणि त्यांच्या अर्जांची स्थिती काय आहे ? विविध न्यायालयांसमोर आरोपींने जामीन अर्ज दाखल केले आहे. आम्ही अपेक्षा करतो की, पोलीस त्यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील. आपल्या आतापर्यंतच्या तपासावरून असे दिसते की कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा केवळ पतसंस्थेचे संचालक आणि अध्यक्षांनीच केला असून त्यामध्ये डीडीआर कार्यालय किंवा लेखा परीक्षकांची कोणतीही भूमिका नाही, त्यामुळे त्यांना अटक झालेली नाही.
आम्हाला हे देखील जाणून घ्यायचे आहे की पोलिसांना मनी ट्रेल सापडला आहे का ? कारण आम्हाला शंका आहे की या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून मोठमोठ्या व्यक्ती यात असू शकतात. आम्हाला हे देखील जाणून घ्यायचे आहे की फॉरेन्सिक ऑडिट अद्याप का सुरू झाले नाही ? चेअरमन आणि डायरेक्टर्सच्या 150 कोटी रुपयांच्या मालमत्तेची ओळख पटल्याचे आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. हा दावा कितपत खरा आहे? आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी त्या मालमत्तांची किती लवकर निलामी केली जाईल.
गरीब ठेवीदारांच्या कष्टाची कमाई धोक्यात असल्याने तपासात पारदर्शकता असावी आणि सर्व भागधारकांना घडामोडींबद्दल माहिती असावी अशी आमची अपेक्षा आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अथवा ब्रेन हॅमरेजमुळे आधीच 8 ठेवीदारांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यात दोन पीडितांनी आत्महत्या देखील केलेली आहे. अजून किती मृत्यू बघावे लागतील ? या सर्व मृत्यूला जबाबदार कोण? या आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरुन डीडीआरचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी सदस्य आणि लेखा परीक्षक / सीए यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावे. आम्ही अपेक्षा करतो की, आपण सर्व पोलिस ठाण्यांना लूटारुंच्या विरोधात स्वतंत्र एफआयआर नोंदवण्याची सूचना द्याल.
वेळेत कोणतेही ठोस परिणाम न दिसल्यास आम्हाला तपास यंत्रणा बदलण्यासाठी सरकारला विनंती करण्यास भाग पाडले जाऊ नये. सर्व ठेवीदारांची अंतिम मागणी ही आहे की, त्यांचे जीवनभराची पूंजी लवकरात लवकर त्यांना परत मिळावी आणि सर्व आरोपींवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात यावी, असेही खा. इ्म्तियाज जलील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe