महाराष्ट्र
Trending

सर्व तलाठ्यांना सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश ! महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी; तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांचा मोबाईन नंबर दर्शनी भागात लावण्याचे निर्देश !!

मुंबई, दि. २०- महसूल विभागातील अतिशय महत्त्वाचे व शासन आणि जनतेमधील दुवा असलेल्या तलाठ्यांसाठी राज्य सरकारने नुकताच शासन निर्णय जारी केला असून तलाठ्यांना सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश याद्वारे देण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पीक परिस्थितीसंदर्भात शेतकर्यांच्या तक्रारीसंदर्भात शासन दरबारी फॉलोअप घेण्यासाठी तलाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, अनेक तलाठी हे कार्यालयात हजरच नसतात अशा तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार राज्य सरकारने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला असून कामचुकार तलाठ्यांवर यानिमित्ताने वचक राहणार आहे. याशिवाय जनतेची कामे सहज व्हावी यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांचा मोबाईल नंबर दर्शनी भागात लावावा. जनतेस कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो, तसेच शेतक-यांशी निगडित पीक पाहणीची ई-पिक पाहणी या मोबाईल अॅप द्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुर्नवसनाचे काम करणे यासाठी तलाठी हे अतिशय महत्वाचा दुवा आहेत. परंतु तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसलेबाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिर्धीकडून वारंवार शासनास तक्रारवजा सूचना / निवेदने प्राप्त होत असतात.

सद्यस्थितीत तलाठी गट क संवर्गाची एकूण मंजूर पदे १५७४४ इतकी असून त्यापैकी ५०३८ इतकी पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपविण्यात येतो. उक्त रिक्त तलाठी पदांपैकी ४६४४ तलाठी पदे भरण्याच्या अनुषंगाने दि.२६.०६.२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तलाठ्यांना सज्जातील गावांना भेटी देणे, पंचनामे स्थळपाहणी, वरिष्ठ कार्यालयांकडे असणाऱ्या बैठका, राजशिष्टाचार पाहणी, तपासण्या इत्यादी कामी उपस्थित रहावे लागते. यास्तव अपवादात्मक परिस्थितीत तलाठी यांना राजा गुख्यालयीन कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही.

एकापेक्षा जास्त गावाकरीता एकच तलाठी असल्याने तलाठ्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सज्जाच्या ठिकाणी / गावाच्या ठिकाणी ठराविक वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. याकरीता यापूर्वी दि.०६.०१.२०१७ च्या शासन पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु प्राप्त परिस्थितीत रिक्त तलाठी पदांची भरतीप्रक्रिया पूर्ण होवून उमेदवार उपलब्ध होईपर्यंत एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार राहणार आहे.

तथापि जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरीता सर्व तलाठी यांनी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालये व अन्य शासकीय इमारतींवर लावण्याबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने सूचना निर्गमित केल्या आहेत:-

(१) तलाठी संवर्गातील नियोजित भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा/ बैठका / कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात दिसेल अशा पध्दतीने सूचना फलक आगाऊ वेळेत लावावा.

(२) तलाठ्यांनी सज्जा कार्यालयीन ठिकाणी उपस्थितीबाबत वेळापत्रक निश्चित करून सदर शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२३/प्र.क्र. ९१/ई-१० वेळापत्रक संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावावे. तसेच सदर वेळापत्रक संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना देखील पाठविण्यात यावे.

(३) तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल अशा स्वरुपात लावावा. तसेच संबंधित सज्जाचे मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचे नांव दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत. (४) जनतेस कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

२. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख / कार्यालयीन प्रमुख / तलाठी कार्यालये यांच्या निदर्शनास सदर निर्देश आणावेत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!