महाराष्ट्रराजकारण
Trending

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ! अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या आमदारांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ !!

मुंबई, दि. २ –  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासू अजित पवार मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही अजित पवारांचा गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवारांनी बंड केले की ही राष्ट्रवादी पक्षाची भूमीका आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. एकूणच आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी राजकीय उलथापालथ झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा व शिंदे सेनेसोबत हातमिळवणी करून राज्यमंत्रिमंडळात आपली वर्णी लावून घेतली आहे. या सरकारचे आता एक वर्षे बाकी असताना अखेरीस अशा पद्धतीचे राजकीय उलथापालथ झाल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आज दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांचे समर्थक आमदारांनी या सरकारमध्ये सहभागी होऊन राजभवनात कायदेशीर शपथविधी उरकला आहे. आता या सरकारमध्ये अजित पवार हेही उपमुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री राहतील.

ईडी, सीबीआय, आयटीचा ससेमिरा वाचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या या गटाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. शिवसेनेत उभी फूट पडून शिंदे सरकार सत्तेत आल्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षांपूर्वी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी मोठा भूकंप घडवून आणला होता. याची चर्चा गेल्या एक वर्षांपासून सुरु आहे. यातच आता राष्ट्रवादीने भाजप आणि शिंदे गटाबरोबर मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने आता पुन्हा राजकारणात वेगळं काही तरी शिजत असल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादीच्या या आमदारांनी घेतली शपथ-

अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा अत्राम, अदिती तटकरे या राष्ट्रवादीतील आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथ विधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी होती. राजभवनात हा शपथविधीचा कार्यक्रम आज दुपारी पार पडला.

 

Back to top button
error: Content is protected !!