छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

धर्मादाय शैक्षणिक संंस्थांना करातून सुट मिळणार, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांचा निर्णय

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – महापालिकेच्या हद्दीतील धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतलेल्या शैक्षणिक संस्थाना लागू करण्यात आलेल्या करातून सुट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शैक्षणिक संस्थाचालकांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या शिष्टमंडळाने मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात मनपा हद्दीतील शैक्षणिक संस्थांना लागू केलेल्या करातून सुट मिळावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अधिकारी अपर्णा थेटे, सर्व वॉर्ड अधिकारी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत शैक्षणिक संस्थाना करातून सुट देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ कायद्याच्या नियमांमध्ये धार्मिक स्थळे आणि लोकसेवा देणार्‍या संस्थांना नियम ३२ (१) (ब) नुसार सामान्य कर, शैक्षणिक कर आणि रोहयो कर यातून सूट देण्याची तरतूद असलीतरी इतर कर मात्र भरावा लागणार आहे. लोकसेवा संस्थामध्ये शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो. धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिलेल्या शैक्षणिक संस्थाना दरवर्षी लेखा परिक्षण अहवाल (ऑडीट) सादर करणे कायदेशीर बंधनकारक आहे.

कायद्याप्रमाणे शैक्षणिक संस्थानी दरवर्षी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे लेखा परिक्षण अहवाल सादर केला नाही तर ती संस्था धर्मादाय राहत नाही असा नियम आहे. अनेक शैक्षणिक संस्था लेखा परिक्षण अहवाल सादर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जेव्हापासून शैक्षणिक संस्थांकडे कर थकलेला आहे, त्याच्यावरील व्याज माफ केले जाईल. मात्र शैक्षणिक संस्थाच्या कराचे मुल्यांकन करून बॅकेच्या दराप्रमाणे व्याज आकारण्यात येईल. मुल्यांकन केल्यानंतर शैक्षणिक संस्थांना महिनाभराच्या आत कराची रक्कम भरावी लागेल असेही जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक संस्थांना सामान्य कर, शैक्षणिक कर आणि रोहयो कर यातून सुट देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे जी. श्रीकांत यांनी बैठकीत जाहीर करताच शैक्षणिक संस्था चालकांनी या निर्णयाला सहमती दर्शवली.

शैक्षणिक संस्थाचालकांकडून सत्कार
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी धर्मादाय शैक्षणिक संस्थांना करातून सूट देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सहकार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे, विभागीय सचिव वाल्मिक सुरासे, एस. पी. जवळकर, मनोज पाटील, सलीम मिर्झा बेग आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!