छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच जणांना एकत्र जमण्यास बंदी ! मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई, सविस्तर वाचा पोलिस आयुक्तांचा आदेश !!

आज, ४ जुलै रोजी रात्रीपासून आदेश लागू होणार, १८ जुलैपर्यंत आदेश लागू राहणार

संभीजनगर लाईव्ह, दि. ४ – संपूर्ण छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई करण्याचा आदेश पोलिस आयुक्तांनी काढला आहे. अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशिल असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत राहावी म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

या कारणांमुळे लागू केला जमावबंदी आदेश-

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार असून तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना तर्फे त्यांच्या निरनिराळया मागण्यांच्या तसेच इतर विषया संदर्भात काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक १८/०७/२०२३ रोजी अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन आहे.

नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव हत्ये प्रकरणावरून दलित समाजामध्ये असंतोष असून त्या अनुषंगाने विविध दलित पक्ष संघटना यांच्याकडून धरणे, मोर्चे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

गायरान जमीन नावावर करण्यात यावी या मागणीकरीता विविध राजकीय पक्ष / संघटनेच्या वतीने धरणे, निदर्शने, मोर्चा इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहराचे नांव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने त्यास मुस्लिम तसेच इतर राजकीय पक्ष, संघटनांचा विरोध असून त्यांच्याकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

मराठा / धनगर मुस्लिम आरक्षण मिळावे त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

औद्योगिक तसेच इतर संघटीत / असंघटीत कामगार संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

या सर्व कारणामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सार्वजनिक शांतता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये पोलिस आयुक्तांनी हा आदेश पारित केला आहे.

असा आहे आदेश..

(अ) शस्त्रे, सोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या, किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाही. (ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही.

(क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची साधने बाळगु नये, जमा करू नये किंवा तयार करता येणार नाही.

(ड) कोणत्याही व्यक्तिची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही…

(इ) जाहीरपणे घोषणा करू नये, गाणे किंवा त्यांचे ध्वनिमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनिक्षेपण करू नये.

(फ) अशा प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करू नये, सोंग अगर हावभाव करू नये. आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तु तयार करू नये, त्याचे प्रदर्शन करू नये किंवा त्यांचा जनतेस प्रसार करता येणार नाही.

हा आदेश छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक ०४/०७/२०२३ चे ००.०१ वाजे पासून ते दिनांक १८/०७/२०२३ चे २४.०० वाजेपर्यंत लागु राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये कारवाईस पात्र राहील, असे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!