डेक्कन ओडिसी ट्रेनने चला पर्यटनाला, अशी असेल शाही सहल ! सहलींमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटन स्थळांचा समावेश !!
डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० पर्यटकांसाठी उपलब्ध
- डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० मुळे होईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ
मुंबई, दि. 21 : डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या आलीशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या ट्रेनला पर्यटन मंत्री श्री. महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यानंतर पर्यटन मंत्री श्री. महाजन बोलत होते. ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे व पनवेल ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावली. यावेळी पर्यटन व सांकृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह भारतीय रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या ट्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा आणि सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. डेक्कन ओडिसी (Ultra Luxury Train) ही राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात आलीशान ट्रेन आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ट्रेनच्या माध्यमातून पंचतारांकित हॉटेलचा अनुभव घेता येतो. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळे पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. जुन्या ट्रेनमध्ये आता विविध बदल केलेले असून या ट्रेनमध्ये एकूण २१ डबे आहेत. ४० डिलक्स सूट आणि दोन प्रेसेडेन्सियल सूट आहेत. तसेच १ कॉन्फरन्स हॉल आहे. याशिवाय हेल्थ स्पा, जनरेटर व्हॅन, जिम, केबल टीव्ही, इंटरनेट, ग्रंथालय, म्युझिक प्लेअर अशा सोयीसुविधा आहेत.
पर्यटन विकासाला मिळेल चालना – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, देशातील प्रसिद्ध असणाऱ्या रेल्वेपैकी एक असलेली ही ट्रेन सुरु झाल्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे. परदेशी पर्यटकामध्ये अत्यंत गाजलेली व पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती डेक्कन ओडिसी ट्रेन आता नव्या रूपात धावणार आहे. ही आपल्यासाठी अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. पर्यटकांनी या ट्रेनच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद घ्यावा.
महाराष्ट्राला पर्यटन नकाशावर वेगळी ओळख करून देणारी ट्रेन
डेक्कन ओडिसी या प्रकल्पास केंद्र शासन व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेच्या चेन्नई येथील फॅक्टरीत सन २००३ मध्ये डेक्कन ओडिसी ही आरामदायी ट्रेन तयार करण्यात आली. सन २००४ मध्ये तत्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते डेक्कन ओडिसी ट्रेनचे उद्घाटन होऊन गाडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. सन २००४ -२०२० दरम्यान डेक्कन ओडिसी आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. परंतु सन २०२०-२१ मध्ये आलेल्या ‘कोविड’मुळे अन्य रेल्वे प्रमाणेच डेक्कन ओडिसीची देखील सेवा बंद झाली. आता पर्यटन क्षेत्र पूर्व पदावर आले असून त्यामुळे आता डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन महामंडळ सज्ज झाले असून नियुक्त केलेल्या ऑपरेटरद्वारे २१ सप्टेंबर २०२३ पासून डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधेने पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरु होत आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
वर्ष २०२३-२४ सहलींचे आयोजन असे आहे
महाराष्ट्र स्प्लेंडर : मुंबई (सीएसएमटी)– नाशिक रोड – औरंगाबाद –पाचोरा – कोल्हापूर – मडगाव (गोवा) – सावंतवाडी,
इंडियन सोजन : मुंबई (सीएसएमटी) – वडोदरा – उदयपूर – जोधपूर – जयपूर – आग्रा – सवई माधोपूर – नवी दिल्ली.,
इंडियन ओडिसी : – नवी दिल्ली – सवईमाधोपूर – आग्रा – जयपूर- उदयपूर – वडोदरा – मुंबई सीएसएमटी.,
हेरिटेज ओडिसी : दिल्ली – आग्रा- सवई माधोपूर- उदयपूर – जोधपूर जैसलमेर – जयपूर – नवी दिल्ली.,
कल्चरल ओडिसी : दिल्ली – संवईमाधोपूर – आग्रा – जयपूर- आग्रा – ग्वाल्हेर झांशी –खजुराहो – वाराणसी – नवी दिल्ली.,
महाराष्ट्र वाईल्ड ट्रेन : मुंबई (सीएसएमटी)– छत्रपती संभाजी नगर – रामटेक – वरोरा – पाचोरा– नाशिक रोड – मुंबई (सीएसएमटी).,
दार्जिलिंग मेल : मुंबई (सीएसएमटी)– वडोदरा – उदयपूर- सवईमाधोपूर – जयपूर- आग्रा – बनारस –सिलीगुडी .,
दार्जिलिंग मेल रिटर्न : सिलिगुडी – बनारस – आग्रा – सवईमाधोपूर- जयपूर – उदयपूर- वडोदरा – मुंबई (सीएसएमटी).,
डेक्कन ओडिसी ट्रेन विविध पुरस्कारांची मानकरी
2014 मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्सचा आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार.,2015 नॉर्थ इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्सचा भारतातील सर्वोत्कृष्ट लक्झरी ट्रेन पुरस्कार.,2015 वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्स – आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार., 2016 वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्स – आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार.,2016 टीटीजे ज्युरी चॉइस अवॉर्ड्स – इनोव्हेशनमध्ये उत्कृष्टता पुरस्कार.,2017 वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्स – आशियातील आघाडीच्या लक्झरी ट्रेनचा पुरस्कार.,2017 लोनली प्लॅनेट तर्फे आयोजित ट्रॅव्हल अॅण्ड लाइफस्टाइल अवॉर्ड – सर्वोत्तम प्रवासी अनुभव पुरस्कार
या नव्या ट्रेनमधील सोयीसुविधा
पर्यटनस्थळे पाहताना पर्यटकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेसा राजेशाही प्रवास अनुभवता यावा याकरीता डेक्कन ओडिसीमध्ये इंटरकॉम, म्युझिक सिस्टिम, उच्च दर्जाचे फर्निचर, वातानुकूलन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीला एकूण 21 डब्बे असून 10 कारमध्ये प्रत्येकी 4 डिलक्स कॅबिन आहेत. इतर दोन पॅसेंजर कारमध्ये प्रत्येकी 2 प्रेसेडेंन्शियल सूटस् आहेत. उर्वरित 9 डब्ब्यांपैकी 1 डब्बा परिषद गृह, 2 डब्बे भोजन कक्ष, 1 डब्बा हेल्थ स्पा, 1 डब्बा बार, 2 डब्बे कर्मचारी वर्ग व उर्वरित 02 डब्बे जनरेटर कार व भांडारगृह अशा प्रकारच्या डब्यांच्या जोडणीने सुविधा निर्माण करण्यासाठी सजविलेले आहेत. आलिशान रेल्वेगाडी पेक्षाही ही गाडी ‘चाकावरचे पंचतारांकित हॉटेल’ वाटावे यादृष्टीने गाडीमध्ये अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
सहल आरामदायी होण्याकरिता प्रत्येक कोचमध्ये अग्नी संरक्षण यंत्र बसविण्यात आले आहे. पँट्री कारमध्ये एलपीजी गॅस ऐवजी इंडक्शन बसविण्यात आले आहे. आतील एसीचा परिणाम चांगला रहावा याकरीता सन 2018 मध्ये छतावर पेंट कोट देण्यात आला आहे. सन 2017 -18 मध्ये जुन्या कन्व्हेन्शनल ट्रॉलीज बदलून नवीन पद्धतीच्या एअर सस्पेन्शन ट्रॉलीज लावण्यात आल्या आहेत. जुन्या पद्धतीच्या ट्रॉलीजमध्ये चालू गाडीमध्ये डबे जास्त प्रमाणात हलून धक्के बसायचे नवीन एअर सस्पेन्शन ट्रॉलीजमुळे आता खूपच आरामदायी झाली आहे. सर्व डब्यांचे गँगवे बदलण्यात आले आहेत. जेणेकरून एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये जाणे सोयीचे झाले आहे. सर्व डब्यांचे फ्लोरींग बदलण्यात आले आहे. तसेच पडद्यांना विशिष्ट प्रकारचे केमिकल लावण्यात आले आहे. सर्व डब्यांच्या शौचालयांना जैव टाकी बसविण्यात आली आहेत. संबंधित रचना रेल्वेच्या लखनौतील संशोधन रचना आणि मानक संस्थेकडून प्रमाणित करण्यात आल्या आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe